राहुल गांधींना ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ नागपुरात युवक काँग्रेसचे आंदोलन

    07-Oct-2026
Total Views |
भाजप कार्यालयाबाहेर घोषणाबाजी; पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात

Image Source:(Internet)

नागपूर
: राहुल गांधी यांना ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ नागपूर शहर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी रात्री गणेशपेठ परिसरात आंदोलन केले. भाजप कार्यालयाबाहेर एकत्र येत कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी राहुल गांधी यांच्या समर्थनार्थही जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

आंदोलनाची माहिती मिळताच पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. या कारवाईनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

दरम्यान, दिल्लीत INDIA आघाडीच्या नेत्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी संसद भवनापासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी पोलिसांनी राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह विरोधी पक्षातील काही नेत्यांना ताब्यात घेतले.

या कारवाईच्या निषेधार्थ नागपूर शहर युवक काँग्रेसने भाजप कार्यालयाबाहेर आंदोलन केले. लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विरोधकांवर कारवाई केली जात असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर परिसरातील राजकीय वातावरण काही काळ तापले होते.