रोहित पवारांच्या काँग्रेस प्रवेशाचा दावा; परिणय फुके यांच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण

    07-Oct-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा पक्षबदलाच्या चर्चांना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आगामी सहा महिन्यांत काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असा दावा भाजप नेते परिणय फुके यांनी केला आहे. नागपुरातील पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी रोहित पवारांच्या राजकीय भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले.

फुके यांच्या मते, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात नेतृत्वाच्या मुद्द्यावरून अंतर्गत राजकीय स्पर्धा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर स्वतःचे राजकीय महत्त्व कायम ठेवण्यासाठी रोहित पवार MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सक्रिय असल्याचा आरोप त्यांनी केला.

MPSC आंदोलनावरून रोहित पवारांना लक्ष्य-
MPSC विद्यार्थ्यांच्या मागण्यांच्या मुद्द्यावरही परिणय फुके यांनी भाष्य केले. विद्यार्थ्यांनी मांडलेल्या १३ मागण्यांपैकी १२ मागण्यांबाबत सरकारने यापूर्वीच निर्णय घेतल्याचा दावा त्यांनी केला.

MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्याचा निर्णय राज्य सरकार घेऊ शकत नाही, तर हा विषय राष्ट्रपतींच्या अधिकारक्षेत्राशी संबंधित असल्याचे फुके यांनी सांगितले. त्यामुळे या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

राहुल गांधी यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहावे, या उद्देशाने आंदोलनाचा वापर केला जात असल्याचा दावाही फुके यांनी केला. राहुल गांधी यांनी आंदोलनाला भेट दिल्यानंतर आंदोलनाची दिशा बदलू शकते आणि त्यानंतर रोहित पवार काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असे त्यांनी म्हटले.

राहुल गांधींवरही गंभीर आरोप-
दरम्यान, राहुल गांधी यांच्या आंदोलनाच्या भूमिकेवरूनही परिणय फुके यांनी जोरदार टीका केली. देशाची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर खराब करण्याचा प्रयत्न राहुल गांधी करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

भारतामध्ये विदेशी गुंतवणूक वाढत असताना त्याला अडथळा निर्माण करण्यासाठी राहुल गांधी प्रयत्नशील असल्याचा आरोपही फुके यांनी केला. याशिवाय राहुल गांधी यांच्याशी ‘अर्बन नक्षलवादी’ शक्तींचा संबंध असल्याचे सांगत त्यांनी राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप केले.

परिणय फुके यांच्या या दाव्यांमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. रोहित पवार किंवा काँग्रेसकडून या आरोपांवर अधिकृत प्रतिक्रिया येते का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.