नागपुरात नऊ वर्षीय मुलीशी गैरवर्तनाच्या आरोपातून जमावाचा हल्ला; उपचारादरम्यान आरोपीचा मृत्यू

    07-Oct-2026
Total Views |
पारडीतील घटनेने खळबळ; मारहाण करणाऱ्यांचा पोलिसांकडून शोध सुरू

Image Source:(Internet)

नागपूर
: नऊ वर्षीय मुलीशी अश्लील कृत्य केल्याच्या आरोपावरून संतप्त नागरिकांनी केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. नारायणदास वैष्णव असे मृत व्यक्तीचे नाव असून, त्याच्याविरोधात यापूर्वीच पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पारडी परिसरातील नऊ वर्षीय मुलगी घराजवळ खेळत असताना नारायणदास वैष्णव याने तिला आपल्या घरी नेऊन तिच्याशी अश्लील वर्तन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी पारडी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी पॉक्सो कायद्यानुसार कारवाई केली होती.

दरम्यान, सोमवारी रात्री काही नागरिकांनी नारायणदासला रस्त्यावर पकडले. त्यानंतर संतप्त जमावाने त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून त्याला जमावाच्या तावडीतून बाहेर काढले आणि उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल केले.

मात्र, मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पारडी पोलिसांनी मारहाणीत सहभागी असलेल्या व्यक्तींची माहिती गोळा करून त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू केले आहे. संबंधितांचा शोध घेण्यात येत असून, पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.

नागपुरात अलीकडे जमावाच्या मारहाणीनंतर मृत्यू झाल्याची ही दुसरी घटना आहे. काही दिवसांपूर्वी बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मॉडेल मिल कॉलनी येथे चोरीचा प्रयत्न केल्याच्या संशयावरून एका व्यक्तीला स्थानिकांनी पकडून मारहाण केली होती. त्यानंतर उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला होता.