नागपुरात कौटुंबिक वादाचा शोकांतिका; मुलीच्या बॅटच्या वारात वडिलांचा मृत्यू

    07-Oct-2026
Total Views |
दारूच्या नशेत मुलीला शिवीगाळ आणि जबरदस्तीचा प्रयत्न केल्याचा आरोप

Image Source:(Internet)

नागपूर :
एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कौटुंबिक वादातून घडलेल्या घटनेत ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दारूच्या नशेत मुलीला शिवीगाळ करून तिच्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. याला विरोध करताना झालेल्या झटापटीत १७ वर्षीय मुलीने लाकडी बॅटने वडिलांच्या डोक्यात वार केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

जयपाल बारेलाल खोलपिटणे असे मृताचे नाव आहे. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, जयपाल यांना दारूचे व्यसन होते आणि त्यावरून कुटुंबात यापूर्वीही वाद होत होते. घटनेच्या रात्री सुमारे ९ वाजता ते मद्यधुंद अवस्थेत घरी आले. त्यानंतर त्यांनी मुलीला शिवीगाळ करत तिच्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

मुलीने याला विरोध केल्यानंतर दोघांमध्ये वाद वाढला. यावेळी मुलीला मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर संतापलेल्या मुलीने घरातील लाकडी बॅट उचलून जयपाल यांच्या डोक्यावर प्रहार केला. या हल्ल्यात गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी एम्स रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. मृताच्या पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून तपास सुरू केला आहे. अल्पवयीन मुलगी पोलिसांच्या देखरेखीखाली असून, तिच्या वयाचा विचार करून कायद्यानुसार पुढील प्रक्रिया केली जात आहे.