नागपूर मध्यवर्ती कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी; बंदीच्या डोक्यावर बादलीने हल्ला

    07-Oct-2026
Total Views |
धंतोली पोलिसांकडून तिघांवर गुन्हा
Image Source:(Internet)

नागपूर :
धंतोली परिसरातील मध्यवर्ती कारागृहात न्यायाधीन बंद्यांमध्ये झालेल्या हाणामारीने खळबळ उडाली. किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका बंदीच्या डोक्यावर मुक्क्यांनी तसेच प्लास्टिकच्या बादलीने हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे. दरम्यान, मारामारी थांबवण्यासाठी घटनास्थळी पोहोचलेल्या सुरक्षा अधिकाऱ्यालाही अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी धंतोली पोलिसांनी तीन न्यायाधीन बंद्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ही घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास कारागृहातील बॅरक क्रमांक ७ आणि ८ दरम्यान घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, न्यायाधीन बंदी दुर्गेश ऊर्फ लिटिल प्रमोद गुप्ता आणि अश्विन ऊर्फ अच्छी मुकुंद इंदुरकर यांचा बंदी विजय खडगांले याच्यासोबत अज्ञात कारणावरून वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि दोघांनी विजयच्या डोक्यावर हात-मुक्क्यांनी मारहाण केली. तसेच प्लास्टिकच्या बादलीनेही त्याच्या डोक्यावर वार केल्याचा आरोप आहे.

कारागृहात बंद्यांमध्ये मारामारी सुरू असल्याची माहिती मिळताच सुरक्षा अधिकारी निमजे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आरोपींना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुरेंद्र ऊर्फ मोनू मनोज समुद्रे याने सुरक्षा अधिकाऱ्यांना त्यांच्या कायदेशीर कर्तव्य बजावण्यापासून रोखण्यासाठी त्यांच्यावर झडप घालण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

मारहाणीत जखमी झालेल्या विजय खडगांले याच्यावर कारागृहातील रुग्णालयात उपचार करण्यात आले. या प्रकरणी धंतोली पोलिसांनी दुर्गेश गुप्ता, अश्विन इंदुरकर आणि सुरेंद्र समुद्रे यांच्याविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.