
Image Source:(Internet)
नवी दिल्ली : चेक बाऊन्स प्रकरणात दिलेल्या आर्थिक आश्वासनांची पूर्तता न केल्याने अभिनेता राजपाल यादव यांना सर्वोच्च न्यायालयाने चांगलेच सुनावले. न्यायालयाने यादव यांना उद्यापर्यंत रक्कम जमा करण्याचे आदेश देत, प्रकरणाची पुढील सुनावणी ७ ऑक्टोबर रोजी ठेवली आहे.
सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यादव यांनी ५ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयाच्या नोंदणी विभागाकडे ५ कोटी रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यांनी ते पूर्ण केले नाही. सुनावणीदरम्यान त्यांच्या वकिलांनी ५० लाख रुपयांचा डिमांड ड्राफ्ट सादर केला.
यावर न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांनी यादव यांना कठोर शब्दांत फटकारले. “या अहंकाराला योग्य जागा दाखवणे गरजेचे आहे. कधी बोलावे याचे भान असायला हवे. तुमची जागा तुरुंगात आहे,” असे न्यायालयाने सुनावले. तक्रारदार गरीब नसल्याचा युक्तिवाद झाल्यावर न्यायालयाने, फसवणुकीच्या प्रमाणात तक्रारदार गरीब ठरतात, असेही स्पष्ट केले.
दरम्यान, चित्रपट निर्मितीसाठी राजपाल यादव आणि त्यांच्या पत्नीने ‘मुरली प्रोजेक्ट्स’कडून ५ कोटी रुपये घेतले होते. चित्रपट वेळेत पूर्ण न झाल्याने दोन्ही पक्षांमध्ये झालेल्या करारानंतर चेक देण्यात आले. त्यापैकी सात चेक बाऊन्स झाल्यानंतर यादव दाम्पत्याविरोधात फौजदारी तक्रारी दाखल करण्यात आल्या.
मे २०२४ मध्ये सत्र न्यायालयाने यादव यांना सहा महिन्यांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती दिली. मात्र, वारंवार आश्वासने देऊनही रक्कम न भरल्याने फेब्रुवारी २०२६ मध्ये त्यांना आत्मसमर्पण करण्याचे आदेश देण्यात आले. नंतर काही रक्कम जमा केल्यानंतर दिलासा मिळाला, मात्र उर्वरित रक्कम न भरल्याने उच्च न्यायालयाने त्यांना तीन महिन्यांची शिक्षा सुनावली.