
Image Source:(Internet)
नवी दिल्ली : भारतातील रिटेल क्षेत्रातून मोठी बातमी समोर आली आहे. रिलायन्स रिटेलने 7-Elevenसोबतची सुमारे पाच वर्षे जुनी भागीदारी संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर भारतात सुरू असलेल्या 7-Elevenच्या सुमारे 60 स्टोअर्सपैकी बहुतांश स्टोअर्स बंद होण्याची शक्यता आहे.
2021 मध्ये रिलायन्सने 7-Elevenला भारतीय बाजारात आणले होते. मात्र, स्थानिक किराणा दुकाने आणि झपाट्याने वाढलेल्या क्विक कॉमर्स कंपन्यांमुळे या मॉडेलसमोर मोठे आव्हान निर्माण झाले. Blinkit, Zepto आणि Instamartसारख्या कंपन्यांनी घरपोच काही मिनिटांत वस्तू उपलब्ध करून दिल्याने ग्राहकांना कन्व्हिनियन्स स्टोअरमध्ये जाऊन खरेदी करण्याची गरज कमी झाली.
7-इंडिया कन्व्हिनियन्स रिटेलच्या आर्थिक आकडेवारीनुसार, मार्च 2026 अखेरच्या आर्थिक वर्षात कंपनीचा महसूल सुमारे 92 कोटी रुपये होता; मात्र कंपनीला तब्बल 90 कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला. महागडे भाडे, कर्मचारी, वीज, इन्व्हेंटरी आणि लॉजिस्टिक्सचा वाढता खर्च यामुळे व्यवसाय टिकवणे आव्हानात्मक ठरले.
दरम्यान, भारतातील FMCG विक्रीपैकी सुमारे 75 टक्के विक्री अजूनही स्थानिक किराणा दुकानांमधून होत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे कमी खर्चात ग्राहकांच्या जवळ उपलब्ध असलेली किराणा दुकाने आणि घरपोच सेवा देणारे क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म यांच्या कात्रीत 7-Elevenचे कन्व्हिनियन्स स्टोअर मॉडेल अडकले.