मनपा आणि मेट्रोमध्ये अधिकाऱ्यांशी ओळख असल्याचे भासवले; सात जणांविरोधात गुन्हा

Image Source:(Internet)
नागपूर : सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देत युवकाकडून तब्बल १२ लाख रुपये घेतल्यानंतर बनावट नियुक्तीपत्र देऊन फसवणूक केल्याचा प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे. आरोपींनी मनपा, मेट्रोसह विविध सरकारी विभागांमध्ये आपली ओळख असल्याचे सांगून युवकाला नोकरी मिळवून देण्याचा विश्वास दिला.
शांतिनगर परिसरातील या प्रकरणात तक्रारदार निखिल मसरके याची २०२५ मध्ये गणेशोत्सवादरम्यान प्रतीक युवराज उराडे याच्याशी ओळख झाली. प्रतीकने आपल्या ओळखीच्या माध्यमातून सरकारी नोकरी लावून देण्याचे आश्वासन निखिलला दिले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून निखिलने आरोपींना वेगवेगळ्या वेळी एकूण १२ लाख रुपये दिले.
रक्कम घेतल्यानंतर आरोपींनी निखिलला नियुक्तीपत्र दिले. हे पत्र घेऊन तो मेट्रोमध्ये रुजू होण्यासाठी पोहोचला असता संबंधित नियुक्तीबाबत कोणतीही अधिकृत नोंद नसल्याचे समोर आले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे निखिलच्या लक्षात आले.
त्यानंतर निखिलने आरोपींकडे पैसे परत मागितले. मात्र, पैसे परत न करता आरोपींकडून टाळाटाळ करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अखेर निखिलने शांतिनगर पोलिसांकडे धाव घेतली.
पोलिसांनी या प्रकरणी विशाल जाधव, स्वप्निल सहारे, रोशन वानखेडे, दिगंबर शिंदे, सचिन राठोड, अरविंद चौधरी आणि प्रतीक युवराज उराडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बनावट नियुक्तीपत्र कोणी तयार केले, पैशांचे व्यवहार कसे झाले आणि या फसवणुकीत आणखी कोणी सहभागी आहे का, याचा तपास शांतिनगर पोलीस करीत आहेत.