
Image Source:(Internet)
नागपूर: अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांविरोधात सक्करदरा पोलिसांनी कारवाई करत २० ग्रॅम एमडी पावडरसह एका आरोपीला ताब्यात घेतले. कुणाल म्हैसकर, रा. हिंगणघाट असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून एमडी पावडरसह मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सक्करदरा पोलिसांचे पथक रात्री परिसरात गस्त घालत असताना दत्तात्रयनगर अग्निशमन केंद्राच्या मागील बाजूस, सक्करदरा लेक गार्डनच्या भिंतीजवळ एक तरुण संशयास्पदरीत्या फिरताना दिसला. पोलिसांना पाहताच त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले.
पंचांसमक्ष घेतलेल्या झडतीमध्ये त्याच्याकडे २० ग्रॅम एमडी पावडर आढळून आली. आर्थिक फायद्यासाठी एमडी जवळ बाळगल्याचा आरोप असून, याप्रकरणी सक्करदरा पोलिसांनी एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, आरोपी हिंगणघाटहून एमडी घेऊन नागपुरात आल्याची माहिती समोर आली असून, त्याला हा अमली पदार्थ पुरवणाऱ्या व्यक्तीचा शोध पोलिस घेत आहेत. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.