विद्यार्थ्यांशी चर्चा झाली तरच प्रश्न सुटतील, सरकारने मार्ग काढावा;शरद पवारांची मागणी

    05-Oct-2026
Total Views |
Image Source:(Internet)

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कारभाराविरोधात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला आता राजकीय नेत्यांचा पाठिंबा मिळू लागला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी रविवारी आंदोलक विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेत त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. त्यानंतर पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून चर्चा करत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली.


“विद्यार्थ्यांना न्याय देणे ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तोडगा निघण्यासाठी सरकार आणि विद्यार्थ्यांमध्ये संवाद होणे आवश्यक आहे. चर्चा न झाल्यास प्रश्न सुटणार नाहीत,” अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली. विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेत सरकारने सकारात्मक मार्ग काढावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये कथित गैरप्रकार, पेपरफुटी, रखडलेल्या भरती प्रक्रिया आणि आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी २ ऑक्टोबरपासून पुण्यात बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाला तीन दिवस उलटूनही सरकारकडून ठोस निर्णय न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी वाढली आहे.


आंदोलक विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींनी रविवारी शरद पवार यांची भेट घेऊन आपल्या विविध मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या. यावेळी पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. मुख्यमंत्री सध्या नागपूरमध्ये असून सोमवारी सकाळी मुंबईत परतल्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांमध्ये लक्ष घालावे आणि त्यांच्याशी संवाद साधावा, अशी विनंती पवार यांनी केली.


विद्यार्थ्यांना न्याय मिळेल आणि त्यांच्या मागण्यांवर योग्य तो मार्ग निघेल, अशी अपेक्षाही शरद पवार यांनी व्यक्त केल्याचे विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींनी सांगितले.


संजय राऊत यांचाही आंदोलनाला पाठिंबा-
दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनीही आंदोलनस्थळी भेट देत विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कामकाजात मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्याची गरज असल्याचा दावा त्यांनी केला.


आयोगातील कथित भ्रष्टाचार आणि परीक्षांमधील गैरप्रकारांवरून राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केली. “एका पिढीच्या भवितव्याशी खेळू नका,” असे म्हणत त्यांनी सरकारने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची मागणी केली.


आंदोलनस्थळी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, अनिल देशमुख यांच्यासह विविध नेत्यांनी भेट देत विद्यार्थ्यांशी चर्चा केली. त्यामुळे एमपीएससीच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला आता राजकीय पाठिंबा वाढताना दिसत आहे.


विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सरकार नेमकी काय भूमिका घेणार आणि सोमवारी मुख्यमंत्री विद्यार्थ्यांशी संवाद साधणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.