MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; अध्यक्ष-सदस्यांच्या चौकशीसाठी समितीची शिफारस

    05-Oct-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कारभारावरून सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला आता महत्त्वाचे वळण मिळाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोगाचे माजी व विद्यमान अध्यक्ष तसेच सदस्यांविरोधात संविधानाच्या कलम 317 अंतर्गत कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यासाठी चौकशी समिती स्थापन करण्याची शिफारस राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्याकडे केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या शिफारशीनुसार उच्च न्यायालयातील निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात यावी आणि या समितीने तीन महिन्यांत आपला अहवाल सादर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. समितीच्या चौकशीतून समोर येणाऱ्या निष्कर्षांच्या आधारे पुढील कारवाई करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे आता राज्यपाल या शिफारशीवर काय निर्णय घेतात, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

MPSCच्या विविध परीक्षांशी संबंधित वाद आणि पेपरफुटीच्या प्रकरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेचा पेपर फुटल्याचे तपासात समोर आल्यानंतर आंदोलनाला आणखी धार आली. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पुण्यात आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू झाले होते.

दरम्यान, विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर 30 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली होती. या चर्चेनंतर MPSCच्या कारभाराशी संबंधित काही महत्त्वाच्या निर्णयांची आश्वासने सरकारकडून देण्यात आली होती. त्यानंतर प्रस्तावित आंदोलन स्थगित करण्यात आले होते. आता आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्यांविरोधात चौकशी समिती स्थापन करण्याची शिफारस करण्यात आल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर MPSCच्या कारभाराची चौकशी आणि त्यानंतर होणाऱ्या संभाव्य कारवाईकडे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.