
Image Source:(Internet)
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी पुण्यात सुरू केलेले आंदोलन दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहे. पेपरफुटी, परीक्षांमधील कथित गैरप्रकार, रखडलेल्या भरती प्रक्रिया आणि आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीवर विद्यार्थी ठाम आहेत. आता या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही एन्ट्री होणार आहे.
राज ठाकरे हे मुंबईतील ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानावरून पुण्याकडे रवाना झाले असून ते आंदोलनस्थळी जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेणार आहेत. विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेणार असल्याने आंदोलनाला आणखी राजकीय धार मिळण्याची शक्यता आहे.
सरकारच्या प्रयत्नांनंतरही आंदोलन कायम-
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन सरकारकडून त्यांच्याशी चर्चा करण्यात आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना आंदोलन स्थगित करण्याचे आवाहन केले. तसेच ड्रग्ज इन्स्पेक्टर पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर MPSC चे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्यावर कारवाई करण्यात आली.
मात्र, या कारवाईने विद्यार्थी समाधानी झालेले नाहीत. आयोगातील कारभारात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत असल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी कायम ठेवली आहे. आयोगाच्या कामकाजाशी संबंधित पुरावे सरकारसमोर मांडल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे.
‘अध्यक्षांचा राजीनामा होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही,’ अशी स्पष्ट भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे.
शरद पवारांकडेही विद्यार्थ्यांची धाव-
आंदोलक विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेऊन आपल्या मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करून तोडगा काढण्याची गरज असल्याचे पवार यांनी सांगितले. तसेच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देण्याची विनंती केली.
पुण्यात राजकीय नेत्यांची गर्दी-
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध राजकीय पक्षांकडून पाठिंबा मिळत आहे. पुण्यातील शास्त्री रोड आणि अलका टॉकीज परिसरातील आंदोलनस्थळी अनेक नेत्यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
अनिल देशमुख, विजय वडेट्टीवार, सतेज पाटील, संजय राऊत, सुषमा अंधारे, वसंत मोरे, अभिजित दीपके, शशिकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकर यांच्यासह विविध नेत्यांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे.
विद्यार्थ्यांच्या मागण्या कोणत्या?
विद्यार्थ्यांनी सरकारसमोर काही महत्त्वाच्या मागण्या ठेवल्या आहेत. त्यामध्ये—
MPSC अध्यक्षांचा तातडीने राजीनामा घेऊन नवीन अध्यक्षांची नियुक्ती करावी.
राज्यातील रिक्त असलेल्या सुमारे ७० हजार शासकीय पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती सुरू करावी.
आयोगाच्या सर्व परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात याव्यात.
परीक्षांमधील कथित गैरप्रकारांची SIT मार्फत स्वतंत्र आणि पारदर्शक चौकशी करावी.
राजस्थानच्या धर्तीवर विद्यार्थ्यांना १०० रुपयांच्या एकाच कार्डद्वारे वर्षभरातील विविध स्पर्धा परीक्षा देता याव्यात.
आता राज ठाकरे आंदोलनस्थळी पोहोचल्यानंतर विद्यार्थ्यांशी काय संवाद साधतात आणि या प्रश्नावर त्यांची नेमकी भूमिका काय असते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांनी मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.