NCBची कारवाई; ओडिशा ते इंदूर तस्करीचा प्रयत्न फसला, तिघे अटकेत
Image Source:(Internet)
नागपूर : स्टील पाइपांच्या (Steel pipes) आडून तब्बल 500 किलो गांजाची वाहतूक करण्याचा तस्करांचा डाव नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) उधळून लावला. ओडिशातील संबलपूर येथून गांजाची ही खेप नागपूरमार्गे इंदूरला नेली जात होती. हुडकेश्वर परिसरात कारवाई करत NCBने गांजा जप्त केला असून, तिघांना अटक केली आहे.
NCBच्या मुंबई झोनल युनिटला मिळालेल्या गुप्त माहितीनंतर नागपूर-भंडारा मार्गावर पथकाने सापळा रचला. रविवारी पहाटे आउटर रिंग रोडवरील महादेव ढाब्याजवळ संशयित कमर्शियल ट्रक अडवण्यात आला. ट्रकची झडती घेतली असता स्टील पाइपांच्या मध्ये लपवून ठेवलेला सुमारे 500 किलो गांजा आढळून आला.
या प्रकरणात आर.पी. गोलदार, ए. सरकार आणि एस.ए.एस. युसूफ ऊर्फ राजाभाई यांना अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान राजाभाई हा नागपुरात राहून तस्करीच्या नेटवर्कसाठी गांजाच्या खेपा स्वीकारत असल्याची माहिती समोर आली.
NCBच्या माहितीनुसार, युसूफ गेल्या चार ते पाच वर्षांपासून अमली पदार्थांच्या तस्करीत सक्रिय असून, त्याच्याविरोधात यापूर्वीही NDPS कायद्यांतर्गत गुन्हे दाखल आहेत. तपास यंत्रणांना चकवा देण्यासाठी तस्करांकडून वारंवार मार्ग बदलून गांजाची वाहतूक केली जात असल्याचेही समोर आले आहे.
या कारवाईनंतर ओडिशापासून नागपूर आणि पुढे इंदूरपर्यंत पसरलेल्या तस्करीच्या नेटवर्काचा तपास सुरू झाला आहे. या रॅकेटशी जोडलेल्या इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी NCBकडून पुढील कारवाई केली जात आहे.