त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा मंगलारंभ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण

    31-Oct-2026
Total Views |
Image Source:(Internet)

त्र्यंबकेश्वर : नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पर्वाला अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. पवित्र कुशावर्त तीर्थाच्या साक्षीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धर्मध्वजारोहणाचा सोहळा पार पडला. यावेळी शृंगेरीपीठाचे जगद्गुरू शंकराचार्य विधुशेखर भारती यांच्यासह अनेक साधू-महंत, धर्मगुरू आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंत्रोच्चार, शंखनाद आणि हर हर महादेवच्या जयघोषाने संपूर्ण त्र्यंबकेश्वर नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी कुशावर्त तीर्थ येथे उपस्थिती लावल्यानंतर साधू-महंतांचे स्वागत केले. त्यानंतर जगद्गुरू शंकराचार्य विधुशेखर भारती यांचे स्वागत करण्यात आले. सोहळ्याचा प्रारंभ पवित्र गोदावरी नदीच्या विधिवत पूजनाने झाला. पुरोहितांच्या मंत्रोच्चारात संकल्पविधी पार पडला. यानंतर गणेशपूजन करून सिंहस्थ कुंभमेळ्यातील सर्व धार्मिक कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडावेत, यासाठी श्रीगणेशाला प्रार्थना करण्यात आली. देवतांचे आवाहन, गोदावरी गंगा स्तवन आणि सामूहिक प्रार्थनेमुळे संपूर्ण परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले.

धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजस्तंभाचे पूजन करण्यात आले. धर्मध्वज आणि ध्वजपताकांचे विधिवत पूजन करून जगद्गुरू शंकराचार्य विधुशेखर भारती यांनीही धर्मध्वजाला वंदन केले. त्यानंतर शंखनाद आणि मंत्रघोषाच्या गजरात धर्मध्वजारोहण करण्यात आले. या ऐतिहासिक सोहळ्याने सिंहस्थ कुंभमेळ्याच्या धार्मिक पर्वाला मंगलमय प्रारंभ झाला.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या परंपरेमध्ये धर्मध्वजाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. बृहस्पतीचा सिंह राशीतील प्रवेश हा सिंहस्थ पर्वाशी संबंधित महत्त्वाचा ज्योतिषीय योग मानला जातो. त्यामुळे या पर्वाच्या प्रारंभी धर्मध्वजारोहण करण्याची परंपरा आहे. धर्मध्वज हा गोदावरी नदीचे पावित्र्य, धार्मिक श्रद्धा आणि प्राचीन संस्कृतीचा प्रतीकात्मक वारसा जपणारा मानला जातो. या ध्वजावर सूर्य, चंद्र, बृहस्पती, सिंह, मगर, ॐकार, स्वस्तिक आणि घंटा अशा विविध धार्मिक प्रतीकांचा समावेश आहे. प्रत्येक प्रतीकामागे धार्मिक आणि पौराणिक संदर्भ जोडलेले आहेत. बारा घंटा, दहा दिशा आणि 'ह्रीं' या बीजाक्षरालाही विशेष आध्यात्मिक महत्त्व आहे.

धर्मध्वजारोहणानंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि शंकराचार्य विधुशेखर भारती यांनी धर्मध्वजाची प्रदक्षिणा केली आणि भगवान त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन प्रार्थना केली. यावेळी उपस्थित साधू-महंत आणि भाविकांनी जयघोष करत या सोहळ्यात सहभाग घेतला. त्यानंतर पवित्र गोदावरीची आरती करण्यात आली. शंखनाद, वेदमंत्र आणि धार्मिक विधींनी सजलेल्या या सोहळ्याने त्र्यंबकेश्वरच्या आध्यात्मिक परंपरेचे भव्य दर्शन घडवले. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या या धर्मध्वजारोहण सोहळ्यामुळे नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.