
Image Source:(Internet)
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय घडेल, याचा अंदाज बांधता येत नाही, असे म्हणत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी भविष्यातील राजकीय घडामोडींबाबत सूचक विधान केले आहे. काल देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. त्यामुळे भविष्यात काय घडेल, हे सांगता येत नाही, असे राऊत म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
भाजप नेते आशिष शेलार यांच्यासोबत झालेल्या संवादाबाबत राऊत यांनी सकारात्मक भूमिका मांडली. शेलार यांना लवकर निघायचे असल्याने दोघांनी बाजूला बसून मनमोकळा संवाद साधला. भाजपमध्ये काही मोजकेच नेते असे आहेत, ज्यांच्यासोबत मांडीला मांडी लावून बसावेसे वाटते. त्यात आशिष शेलार यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. आमचे राजकारण सुडाचे नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पक्षांतराच्या मुद्द्यावर बोलताना नेते स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष सोडतात, असे राऊत म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी आपले वैयक्तिक वैर नसून त्यांच्याविरोधातील राजकीय लढा सुरूच राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच शिवसेनेमुळेच आपली राजकीय ओळख निर्माण झाल्याची कबुलीही त्यांनी दिली.
यावेळी राऊत यांनी महाभारत आणि सध्याच्या राजकारणातील साम्य अधोरेखित केले. महाभारतातील पात्रे आजच्या राजकारणातही पाहायला मिळतात. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच्या प्रदीर्घ सहवासावर पुस्तक लिहिण्याचा अनेकांचा आग्रह असला, तरी काही आठवणी मनातच ठेवणे योग्य असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या आगामी पुस्तकासह लेखनस्वातंत्र्याचाही त्यांनी उल्लेख केला. एखाद्या लेखकाचे विचार पटत नसले तरी त्याला ते मांडण्याचा अधिकार आहे, हीच लोकशाहीची खरी ओळख असल्याचे राऊत म्हणाले.