कामठीत ओडिशातून गांजाची तस्करी; ५ किलोहून अधिक गांजा जप्त, एकाला अटक

    31-Oct-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : कामठीत गांजा विक्रीसाठी आणणाऱ्या टोळीचा नवीन कामठी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. ओडिशातून गांजा घेऊन आलेल्या तिघांपैकी एकाला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून ५ किलोहून अधिक गांजा आणि मोबाईल असा एकूण १ लाख ११ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. मात्र, कारवाईदरम्यान त्याचे दोन साथीदार पसार होण्यात यशस्वी झाले.

पोलिसांना शनिवारी पहाटे ओडिशातील कांटाबांजी येथून तिघे जण गांजा घेऊन कामठीत येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार कामठी-नागपूर मार्गावरील आशा हॉस्पिटलसमोर पोलिसांनी सापळा रचला. यावेळी विणकर कॉलनी येथील मोहम्मद शफीक मोहम्मद रफीक अन्सारी याला पकडून त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे गांजा आढळून आला. या प्रकरणात फैजान अन्सारी फिरोज अन्सारी आणि ओडिशातील शादाब हे दोघे फरार झाले. शफीकविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.