उत्तर प्रदेशच्या मतदार यादीतून १ कोटींहून अधिक हिंदूंची नावे वगळली? मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा दावा

    31-Oct-2026
Total Views |
Image Source:(Internet)

लखनऊ : उत्तर प्रदेशातील मतदार यादीवरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठा दावा केला आहे. राज्यातील मतदार यादीतून तब्बल एक कोटींपेक्षा अधिक हिंदू मतदारांची नावे गायब असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर पात्र मतदारांची नावे पुन्हा मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी विशेष मोहीम राबवावी, असे आवाहन त्यांनी केले.

भाजपच्या राज्य कार्यकारिणी समितीच्या बैठकीत बोलताना योगी आदित्यनाथ यांनी मतदार यादीतील नावांबाबत काही आकडेवारी मांडली. त्यांच्या दाव्यानुसार, सुमारे ६६ लाख नागरिकांची नावे पंचायत मतदार यादीत आहेत; मात्र विधानसभा मतदार यादीत त्यांचा समावेश झालेला नाही. तसेच सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या जवळपास ५५ लाख लाभार्थ्यांची नावेही मतदार यादीत नसल्याचे त्यांनी सांगितले.

तरुण मतदारांच्या नावांबाबतही चिंता-
१८ ते १९ वयोगटातील नवमतदारांचाही मुख्यमंत्री योगी यांनी विशेष उल्लेख केला. या वयोगटातील अंदाजे साडेचार लाख तरुणांची नावे मतदार यादीत नसल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे मतदार यादीचे बारकाईने परीक्षण करण्याची गरज असल्याचे त्यांनी बैठकीत स्पष्ट केले.

प्रत्येक मतदान केंद्रावर तपासणी करण्याचे निर्देश-
मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी बूथ स्तरावर सक्रिय व्हावे, असे निर्देश योगी आदित्यनाथ यांनी दिले. बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) यांच्याशी समन्वय साधून प्रत्येक मतदान केंद्रावरील मतदार यादी तपासावी आणि यादीत नाव नसलेल्या पात्र नागरिकांचा समावेश करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले.

या कामात केवळ बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांनीच नव्हे, तर पक्षातील सर्व पदाधिकारी आणि जबाबदार नेत्यांनी सहभागी व्हावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. खासदार, आमदार तसेच संघटनेतील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी या प्रक्रियेकडे लक्ष देऊन वेळोवेळी आढावा घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

दरम्यान, मतदार यादीतील कथित त्रुटी आणि पात्र मतदारांची नावे समाविष्ट करण्याच्या मुद्द्यावरून उत्तर प्रदेशातील राजकीय चर्चेला वेग येण्याची शक्यता आहे. मात्र, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मांडलेली आकडेवारी आणि एक कोटींहून अधिक हिंदू मतदारांची नावे गायब असल्याचा दावा अधिकृत मतदार यादीच्या आकडेवारीशी पडताळणे आवश्यक आहे.