
Image Source:(Internet)
नागपूर : कॉटन मार्केट चौकातील म्हाडा कॉलनी परिसरात शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास बांधकाम सुरू असताना टॉवर क्रेन कोसळली. या दुर्घटनेत दोन मजुरांचा मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले. जखमींवर ओरिएंट हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
मृतांमध्ये भंडारा येथील विश्वनाथ कटाने आणि उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील मुकेश निषाद यांचा समावेश आहे. या बांधकामाचे कंत्राट विजय शिरके कंपनीकडे आहे.
क्रेन नेमकी कशामुळे कोसळली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. संबंधित विभागाच्या मेकॅनिकल अभियंत्यांकडून क्रेनची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच कंत्राटदार कंपनी आणि देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांकडूनही माहिती घेतली जाणार आहे. कामगारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक खबरदारी घेण्यात आली होती का, याचाही तपास केला जाईल.
या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती DCP राहुल मदने यांनी प्रसारमाध्यमांना दिली.