
Image Source:(Internet)
अकोला : अतिवृष्टी आणि पीक नुकसानीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत देण्यात यावी, या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आमदार तथा पक्षाचे उपनेते नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी वाशीम जिल्ह्यातील वनोजा येथे समृद्धी महामार्गावर तीव्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात हजारो शेतकरी आणि शिवसैनिक सहभागी झाले होते. आंदोलकांनी महामार्ग रोखण्याचा प्रयत्न करताच पोलिसांनी त्यांना अडवले. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार झटापट झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. त्यानंतर आमदार नितीन देशमुख यांच्यासह अनेक आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले.
शेतकऱ्यांना नुकसानभरपाईच्या नावाखाली केवळ पाच हजार रुपयांची तात्पुरती मदत देऊन चालणार नाही, तर अतिवृष्टी आणि पीक नुकसानीची योग्य भरपाई मिळाली पाहिजे, अशी भूमिका ठाकरे गटाने मांडली आहे. प्रत्येक हेक्टरमागे एक लाख रुपयांची मदत देण्यात यावी, अशी प्रमुख मागणी आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली. शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून उभारण्यात आलेल्या समृद्धी महामार्गावरच आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलन करण्याची वेळ आली असल्याचे आमदार नितीन देशमुख यांनी म्हटले.
या आंदोलनाची जोरदार तयारी गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. आमदार देशमुख यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अकोला आणि वाशीम जिल्ह्यांतील विविध भागांत जाऊन शेतकऱ्यांशी संपर्क साधला होता. आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देत शुक्रवारी सकाळपासूनच वनोजा येथे शेतकरी आणि शिवसैनिकांची गर्दी जमू लागली. काही वेळातच आंदोलनस्थळी हजारोंचा जनसमुदाय एकत्र आला.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानेही खबरदारी घेत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. विविध जिल्ह्यांमधून दीड हजारांहून अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी वनोजा परिसरात दाखल झाले होते. मात्र, मोठा बंदोबस्त असतानाही आंदोलकांनी समृद्धी महामार्गावर उतरून रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता दोन्ही बाजूंमध्ये धक्काबुक्की आणि झटापट झाली. परिस्थिती चिघळू नये यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार करत आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला. यानंतर आमदार नितीन देशमुख यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
दरम्यान, समृद्धी महामार्ग हा राज्यातील महत्त्वाचा द्रुतगती मार्ग असल्याने येथे रास्ता रोको केल्यास वाहतुकीत अडथळे निर्माण होण्यासोबतच प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भूमिका पोलिसांनी घेतली होती. त्यामुळे आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आली होती. आयोजकांना यासंदर्भात नोटिसाही बजावण्यात आल्या होत्या. मात्र, परवानगी नाकारल्यानंतरही ठाकरे गटाने आंदोलन मागे न घेता महामार्गावर उतरून सरकारविरोधात घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईचा प्रश्न आता रस्त्यावर आल्याने या आंदोलनाची चर्चा परिसरात सुरू झाली आहे.