
Image Source:(Internet)
ठाणे : प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणाला एक महिना उलटूनही अद्याप न्याय मिळालेला नसल्याने कुटुंबीयांचा संताप वाढत आहे. वडिलांच्या हत्येतील आरोपींना अटक व्हावी, यासाठी त्यांचे पुत्र राम पूर्णेकर सातत्याने प्रयत्न करत आहेत. आता त्यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत पोलिस प्रशासनासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या प्रकरणामुळे ठाण्यातील राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. काही दिवसांपूर्वी पूर्णेकर कुटुंबीयांनी पोलिस ठाण्याबाहेर आंदोलन केले होते. या आंदोलनाला शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी भेट देत पाठिंबा दर्शवला होता. यावेळी मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर कारवाई करून त्यांना अटक करण्याची मागणीही करण्यात आली होती.
राम पूर्णेकरांची कापूरबावडी पोलीस ठाण्यात धाव-
आंदोलनादरम्यान काही आंदोलक आणि समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची घटना घडली होती. यावेळी त्यांना मारहाण झाल्याचा आरोपही करण्यात आला. या पार्श्वभूमीवर राम पूर्णेकर यांनी वकिलांसह कापूरबावडी पोलीस ठाण्यात जाऊन संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली.
या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी पोलिसांसोबत झालेल्या चर्चेची माहिती दिली. आंदोलकांना झालेल्या कथित मारहाणीप्रकरणी वकिलांनी पोलिसांना लेखी निवेदन दिले असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणात कायदेशीर मार्गानेच लढा देणार असल्याचे स्पष्ट करत संबंधित दोषींवर वरिष्ठ पोलीस अधिकारी कारवाई करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
समर्थकांना त्रास देण्याऐवजी मुख्य आरोपींवर कारवाई करा-
राम पूर्णेकर यांनी पोलिसांसमोर दोन प्रमुख मागण्या मांडल्या. आमच्या समर्थकांना अटक करून त्यांना विनाकारण त्रास देऊ नये. त्याऐवजी हत्या प्रकरणात ज्यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत, त्या मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांच्यावर कारवाई करावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.
यासंदर्भात डीसीपी यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले. प्रकरणातील महत्त्वाची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवण्यात आली असून योग्य ती कठोर कारवाई करण्याचे आश्वासन मिळाल्याचा दावा राम पूर्णेकर यांनी केला.
मुख्यमंत्र्यांकडे थेट हस्तक्षेपाची मागणी
दरम्यान, राम पूर्णेकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांनाही या प्रकरणात लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे. ठाण्यात सुरू असलेल्या घडामोडींवर नाराजी व्यक्त करत त्यांनी हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींना अटक करण्याची मागणी केली.
यावेळी ते म्हणाले, "मुख्यमंत्र्यांना मी एवढंच सांगेन की, साहेब, ठाण्यामध्ये जे सुरू आहे ते खूप चुकीचं आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपींना तुम्ही अटक करा, बाकीच्यांना जाऊ द्या."
वडिलांच्या हत्येला महिना उलटूनही न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या पूर्णेकर कुटुंबीयांचा संघर्ष अद्याप थांबलेला नाही. राम पूर्णेकर यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे साकडे घातल्याने आता या प्रकरणात सरकार आणि पोलीस प्रशासन काय भूमिका घेणार, तसेच आरोपींच्या अटकेबाबत कोणता निर्णय होणार, याकडे ठाणेकरांचे लक्ष लागले आहे.