
Image Source:(Internet)
नागपूर : शहरात प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखूची अवैध विक्री सुरू असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. यशोधरा नगर परिसरात पोलिस आयुक्तांच्या एस्कॉर्ट पथकाने मध्यरात्री छापा टाकून मोठ्या प्रमाणात गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखू जप्त केली. या कारवाईत ९ लाख ३७ हजार ९५१ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, याप्रकरणी दोन सख्ख्या भावांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई २९ ऑक्टोबरच्या रात्री मेहबूबपुरा परिसरातील टिपू सुलतान चौक आणि नूरी मशिदीजवळ करण्यात आली. परिसरात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा करून त्याची गुप्तपणे विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी पंचांच्या उपस्थितीत संबंधित ठिकाणी छापा टाकला.
छाप्यादरम्यान फईम अंसारी याच्या घराच्या पहिल्या मजल्यावरील टिनशेडच्या खोलीत गुटखा आणि सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला. तसेच त्याचा भाऊ नदीम उर्फ लखन अंसारी याने भाड्याने घेतलेल्या खोलीतही मोठ्या प्रमाणात तंबाखूजन्य पदार्थ सापडले. पोलिसांनी दोन्ही ठिकाणांवरील माल जप्त केला.
पोलिसांच्या चौकशीत फईम अंसारी याने जप्त केलेला माल आपला भाऊ नदीम याचा असल्याचे सांगितले. दोघे भाऊ शहरातील विविध पानठेला चालकांना प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा पुरवठा करत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
या प्रकरणी फईम अंसारी आणि नदीम उर्फ लखन अंसारी यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या अवैध व्यवसायात आणखी कोणाचा सहभाग आहे आणि शहरात या मालाचा पुरवठा कुठपर्यंत केला जात होता, याचा शोध यशोधरा नगर पोलिसांकडून घेतला जात आहे.