नागपूरच्या गड्डीगोदामात ३० गोवंश कोंडून ठेवल्याचा प्रकार उघड; गुन्हे शाखेची छापेमारी, दोघांना अटक

    30-Oct-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : गड्डीगोदाम परिसरात अवैध कत्तलीसाठी गोवंशाची साठवणूक केल्याचा प्रकार गुन्हे शाखेच्या कारवाईत उघडकीस आला आहे. मशिदीजवळील एका खोलीत दाटीवाटीने बांधून ठेवलेल्या ३० जनावरांची पोलिसांनी सुटका केली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, एक जण फरार आहे.

शुक्रवारी सकाळी गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक २ च्या पथकाला गड्डीगोदाम मशिदीजवळ एका खोलीत गोवंश बांधून ठेवल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत छापा टाकला. तपासणीदरम्यान खोलीत १९ गायी, ३ बैल आणि ८ वासरे असे एकूण ३० जनावरे आढळून आली.

या कारवाईत मोहम्मद अनीस अब्दुल हमीद कुरेशी आणि साबिर अयुब कुरेशी (दोघेही रा. गड्डीगोदाम) यांना पोलिसांनी अटक केली. तर मोहम्मद उमर मोहम्मद महबूब कुरेशी हा पसार झाला असून, त्याचा शोध घेतला जात आहे.

पोलिसांनी घटनास्थळावरून ३० जनावरांसह एक मोबाईल आणि बोलेरो पिकअप वाहन जप्त केले. जप्त केलेल्या सर्व साहित्याची एकूण किंमत १० लाख १० हजार रुपये असल्याची माहिती आहे. सुटका करण्यात आलेल्या जनावरांना पुढील देखभालीसाठी धंतोली येथील गोशाळेत हलविण्यात आले.

या प्रकरणी सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार आरोपीचा शोध आणि पुढील तपास सदर पोलीस करीत आहेत.