कुरखेडा येथे जेवणासाठी बसलेल्या कुटुंबासमोरच पित्याची हत्या; जळत्या लाकडाने डोक्यावर केला वार

    30-Oct-2026
Total Views |
Image Source:(Internet)

गडचिरोली : पैशांच्या कारणावरून झालेल्या वादातून मद्यधुंद मुलाने जन्मदात्या वडिलांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यात घडली. घराच्या अंगणात शेकोटी पेटवून कुटुंबीयांसोबत जेवण सुरू असताना मुलाने शेकोटीतील जळते लाकूड उचलून वडिलांच्या डोक्यावर प्रहार केला. या हल्ल्यात वडिलांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (२९ ऑक्टोबर) सायंकाळी सातच्या सुमारास चारभट्टी येथील बिरसा नगर परिसरात घडली.

मनोहर निरंगाशहा गोटा (५१) असे मृत वडिलांचे नाव असून, नागेश मनोहर गोटा (२९) असे आरोपी मुलाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी परिसरात अवकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्याने वातावरणात गारवा होता. त्यामुळे गोटा कुटुंबीयांनी घराच्या अंगणात शेकोटी पेटवली होती. शेकोटीच्या उबेत कुटुंबातील सदस्य जेवणासाठी बसले होते. याचवेळी मनोहर आणि त्यांचा मुलगा नागेश यांच्यात पैशांच्या कारणावरून वाद सुरू झाला.

सुरुवातीला शाब्दिक वाद असलेल्या या प्रकाराने काही वेळातच गंभीर स्वरूप धारण केले. नागेश मद्यधुंद अवस्थेत असल्याने त्याचा राग अनावर झाला. संतापाच्या भरात त्याने शेकोटीतील जळते लाकूड उचलून वडील मनोहर यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मनोहर यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पुराडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कुरखेडा ग्रामीण रुग्णालयात पाठविला. या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, आरोपी नागेश गोटा याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पुराडा पोलीस करीत आहेत.