पीएम किसानचा २४ वा हप्ता जमा; महाराष्ट्रातील ९१ लाख शेतकऱ्यांना १,८३५ कोटींची मदत

    30-Oct-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : शेतीचा वाढता खर्च, अनियमित पाऊस आणि आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २४ वा हप्ता राज्यातील ९१ लाख १२ हजार ७६५ शेतकऱ्यांच्या खात्यांत जमा झाला आहे. या माध्यमातून महाराष्ट्राला एकूण १ हजार ८३५ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ही रक्कम मिळाल्याने लाभार्थी शेतकऱ्यांना काहीसा आर्थिक आधार मिळणार आहे.

गुजरातमधील बनासकांठा येथे आयोजित कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरातील लाभार्थ्यांना निधी वितरित केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील वर्षा निवासस्थानातून दूरदृश्य प्रणालीद्वारे कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी कृषी विभागाचे सचिव परिमल सिंह उपस्थित होते.

या कार्यक्रमात शेतीसमोरील आव्हाने आणि शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांवर मोदी यांनी भाष्य केले. खतांच्या किमतीतील चढ-उतार, सिंचनाची गरज आणि हवामान बदलाचा शेतीवर होणारा परिणाम लक्षात घेऊन केंद्र सरकार विविध योजनांद्वारे मदत करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पीएम किसान योजनेतून आतापर्यंत देशभरातील शेतकऱ्यांना सुमारे चार लाख कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. खतांसाठी सरकारने १६ लाख कोटी रुपये खर्च केले असून, पीक विमा योजनेतून गेल्या दहा वर्षांत दोन लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसानभरपाई देण्यात आली आहे. गहू आणि धान उत्पादकांनाही किमान आधारभूत किमतीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक मोबदला मिळाल्याचे मोदी यांनी सांगितले.

शेतीत पारंपरिक साधनांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सौरऊर्जेचा वापर वाढविण्यावरही भर दिला जात आहे. पीएम कुसुम योजनेतून आतापर्यंत १२ लाख सौरपंप उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्याचबरोबर हवामानातील बदलांना तोंड देऊ शकणाऱ्या बियाण्यांच्या तीन हजार सुधारित जाती विकसित करण्यात आल्या आहेत.

शेतीसोबत पशुपालनातून उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीनेही विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. देशभरातील पशुधनासाठी लाळ्या-खुरकूत प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत १५० कोटी लसमात्रा देण्यात आल्या असून, आठ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला आहे.

दरम्यान, ३१ ऑक्टोबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित 'रन फॉर युनिटी'मध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही प्रधानमंत्री मोदी यांनी केले.