
Image Source:(Internet)
नागपूर : टोलनाक्यावर रांगेत उभे राहण्याचा त्रास कमी करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या FASTag व्यवस्थेचा वापर देशभरातील कोट्यवधी वाहनचालक करत आहेत. मात्र, या डिजिटल टोल प्रणालीतील चुकीच्या शुल्क आकारणीचा धक्कादायक आकडा समोर आला आहे. 2025 या एका वर्षात 17 लाख 66 हजार FASTag व्यवहारांमध्ये चुकीच्या पद्धतीने टोल शुल्क वसूल करण्यात आले.
देशभरातील महामार्गांवर 2025 मध्ये FASTagद्वारे तब्बल 646 कोटी व्यवहार झाले. त्यापैकी 17.66 लाख व्यवहारांमध्ये चुकीची शुल्ककपात झाल्याचे आढळले. एकूण व्यवहारांच्या तुलनेत हे प्रमाण केवळ 0.03 टक्के असले, तरी प्रत्यक्ष संख्येचा विचार करता लाखो वाहनचालकांना याचा फटका बसला आहे.
पैसे परत मिळतात, पण तक्रार करावी लागते-
FASTag खात्यातून चुकीचे शुल्क वजा झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर संबंधित व्यवहाराची पडताळणी केली जाते. चूक स्पष्ट झाल्यास संबंधित बँकेमार्फत वाहनचालकाच्या खात्यात रक्कम परत केली जाते.
मात्र, ही प्रक्रिया सुरू होण्यासाठी वाहनचालकाने चुकीच्या व्यवहाराची तक्रार नोंदवणे आवश्यक आहे. त्यामुळे FASTag वापरणाऱ्या वाहनमालकांनी आपल्या खात्यातील व्यवहार आणि टोल कपातीची माहिती नियमितपणे तपासणे महत्त्वाचे ठरते.
देखरेख असतानाही चुका का?
FASTagच्या इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन व्यवस्थेवर टोल मॉनिटरिंग अँड कंट्रोल सेंटरकडून देखरेख ठेवली जाते. याशिवाय बँका, सिस्टिम इंटिग्रेटर्स आणि टोल शुल्क वसूल करणाऱ्या संस्थांमध्ये समन्वयाची यंत्रणाही कार्यरत आहे.
तरीही लाखो व्यवहारांमध्ये चुकीची कपात झाल्याने या डिजिटल प्रणालीच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. चुकीची टोलवसुली नेमकी कोणत्या कारणामुळे होते आणि ती रोखण्यासाठी आणखी कोणत्या उपाययोजना केल्या जाणार? याकडे आता वाहनचालकांचे लक्ष लागले आहे.
FASTagमुळे टोलवसुली जलद झाली असली, तरी खात्यातून होणाऱ्या प्रत्येक कपातीवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी वाहनचालकांवरही आली आहे.