
Image Source:(Internet)
बारामती : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 3 नोव्हेंबर रोजी बारामती दौऱ्यावर येणार असून विद्या प्रतिष्ठानच्या परिसरात आयोजित विशेष कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात त्यांच्या हस्ते भगवान गौतम बुद्धांच्या भव्य मूर्तीचे अनावरण करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)चे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.पंतप्रधान मोदी 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता बारामती विमानतळावर दाखल होतील. त्यानंतर ते थेट विद्या प्रतिष्ठानच्या परिसरात होणाऱ्या मुख्य कार्यक्रमासाठी रवाना होणार आहेत.
भगवान बुद्धांची 4 टनांची भव्य मूर्ती-
विद्या प्रतिष्ठान परिसरात उभारण्यात आलेल्या भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीचे वजन तब्बल 4 टन असल्याचे सांगण्यात आले आहे. मूर्तीची भावमुद्रा आणि कलात्मक स्वरूप विशेष आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.
मूर्ती ज्या सभागृहात स्थापित करण्यात आली आहे, तेथे भगवान बुद्धांच्या विविध हस्तमुद्रांचे स्वतंत्र दालनही तयार करण्यात आले आहे. या हस्तमुद्रांचा अर्थ आणि त्यामागील महत्त्वाची माहितीही येथे प्रदर्शित करण्यात आली आहे.
महापुरुषांच्या जीवनकार्याचे चित्ररूप दर्शन-
बुद्ध मूर्ती असलेल्या सभागृहाच्या पुढील भागात एक विशेष गोलाकार दालन उभारण्यात आले आहे. या दालनात महाराष्ट्र आणि देशाच्या इतिहासात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या महापुरुषांचे जीवन व कार्य चित्रांच्या माध्यमातून मांडण्यात आले आहे.
या दालनात राजमाता जिजाबाईंसह विविध मान्यवर व्यक्तिमत्त्वांची भव्य चित्रे लावण्यात आली आहेत. प्रत्येक चित्राची उंची सुमारे 9 फूट आणि रुंदी 5 फूट असल्याची माहिती देण्यात आली आहे.
मान्यवरांना निमंत्रण-
या विशेष कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे.
याशिवाय ऑक्सफर्ड विद्यापीठाचे प्रमुख, खासदार पार्थ पवार तसेच उद्योगपती सायरस पूनावाला यांनाही कार्यक्रमासाठी आमंत्रण देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर बारामतीत तयारीला वेग आला असून 3 नोव्हेंबरच्या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.