विमान बाहेर काढल्यानंतर गेट बंद करताना दुर्घटना; एक कर्मचारी गंभीर
Image Source:(Internet)
नागपूर : MIHANमधील इंदामेर कंपनीच्या MRO प्रकल्पात शनिवारी घडलेल्या दुर्घटनेत 42 वर्षीय सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला. विमानाच्या मेंटेनन्स हँगरचे तब्बल 40 मीटर लांबीचे अवजड गेट अचानक कोसळल्याने ही दुर्घटना घडली. या घटनेत आणखी एक कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे.
विमान हँगरमधून बाहेर काढल्यानंतर गेट बंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. याचवेळी सुरक्षा रक्षक कैलाश चाफेकर गेट हाताने ओढत होते. अचानक ऑटोमॅटिक यंत्रणेशी जोडलेले अवजड गेट खाली कोसळले. त्याखाली कैलाश चाफेकर आणि आणखी एक कर्मचारी अडकले.
घटनेची माहिती मिळताच दोघांना तातडीने AIIMS रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी कैलाश चाफेकर यांना मृत घोषित केले. दुसऱ्या कर्मचाऱ्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
कैलाश चाफेकर यांची काही काळापूर्वीच सुरक्षा रक्षक म्हणून कंपनीत नियुक्ती झाल्याची माहिती आहे. दुर्घटनेनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी कंपनीच्या सुरक्षाव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. तांत्रिक स्वरूपाचे काम सुरक्षा रक्षकाकडून का करून घेण्यात आले, असा सवाल त्यांनी केला आहे.
या दुर्घटनेमागील तांत्रिक कारण तसेच सुरक्षेच्या नियमांचे पालन झाले होते का, याचा तपास सोनेगाव पोलीस करत आहेत. कंपनीची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.