विधान परिषद निवडणूक: काँग्रेसकडून तीन उमेदवारांची घोषणा, नागपूर,पुण्यासह अमरावतीत लढत रंगणार

    03-Oct-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. काँग्रेसने नागपूर पदवीधर, पुणे शिक्षक आणि अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी आपल्या तीन उमेदवारांची अधिकृत घोषणा केली आहे.

काँग्रेसने जाहीर केलेल्या यादीप्रमाणे नागपूर पदवीधर मतदारसंघातून विद्यमान आमदार अभिजीत वंजारी यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर पुणे शिक्षक मतदारसंघातून विद्यमान आमदार जयंत आसगावकर यांना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे.

दरम्यान, अमरावती शिक्षक मतदारसंघातून अदिती पोहरे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. तीन उमेदवारांची नावे जाहीर झाल्याने काँग्रेसमधील उमेदवारीबाबत सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

काँग्रेसकडून उमेदवारांची घोषणा-
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांकडून इच्छुकांची संख्या मोठी आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसने आपल्या उमेदवारांची नावे आधीच जाहीर केली आहेत. आता भाजपसह इतर प्रमुख पक्षांकडून उमेदवारांची घोषणा कधी केली जाते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

निवडणुकीचे वेळापत्रक-
अधिसूचना जारी : 29 सप्टेंबर 2026

नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख : 6 ऑक्टोबर 2026

अर्जांची छाननी : 7 ऑक्टोबर 2026

अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख : 9 ऑक्टोबर 2026

मतदान : 23 ऑक्टोबर 2026, सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत

मतमोजणी व निकाल : 27 ऑक्टोबर 2026

काँग्रेसने तीनही मतदारसंघांसाठी उमेदवार जाहीर केल्यानंतर आता नागपूर, पुणे आणि अमरावतीमध्ये निवडणुकीच्या हालचालींना आणखी वेग येण्याची शक्यता आहे. इतर पक्षांचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर या मतदारसंघांतील निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.