
Image Source:(Internet)
नागपूर : नागपूरच्या तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीवर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इतवारी येथील भाजी मंडई परिसरात शुक्रवारी, 2 ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे 1.45 वाजता ही घटना घडली. या हल्ल्यात श्रुती ही महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणातील आरोपी पतीची ओळख 37 वर्षीय अंकुश पिंटू बागडी अशी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंकुश याला पत्नी श्रुतीच्या चारित्र्यावर संशय होता. याच कारणावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
शुक्रवारी रात्री पुन्हा याच मुद्द्यावरून दोघांमध्ये वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर अंकुशने चाकू काढून श्रुतीवर हल्ला केला. आरोपीने तिच्या मानेसह शरीराच्या विविध भागांवर तब्बल 30 ते 40 वार केल्याचा आरोप आहे. त्यावेळी घरात श्रुतीचा अल्पवयीन मुलगा आणि मुलगीही उपस्थित होते.
हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या श्रुतीची माहिती तिच्या अल्पवयीन मुलाने फोन करून त्याचे आजोबा ध्रुव उपाध्याय यांना दिली. त्यानंतर कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, पोलिसांनाही घटनेची माहिती मिळाल्यानंतर तहसील पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून श्रुतीला उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, आरोपी अंकुश बागडीविरुद्ध लूटमार, मारहाण आणि हफ्ता वसुलीसह सुमारे 21 गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. तहसील पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे. आरोपीच्या संभाव्य ठिकाणांवर पोलिसांकडून छापेमारी केली जात आहे.