परवानगीशिवाय शिवाजी पार्कवर आंदोलन; अभिजीत दीपकेसह CJPच्या चौघांविरोधात तक्रार

    03-Oct-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी शिवाजी पार्क येथे करण्यात आलेल्या आंदोलनावरून कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) पदाधिकाऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पोलिसांची परवानगी नसताना आंदोलन केल्याचा आरोप करत अभिजीत दीपके यांच्यासह चार पदाधिकाऱ्यांविरोधात शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

या तक्रारीत अभिजीत दीपके, सौरभ दास, आशुतोष रांका आणि रत्ना सिंह यांची नावे आहेत. पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतरही मोठ्या संख्येने नागरिकांना एकत्र करून आंदोलन केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

शिवाजी पार्कच्या वापरासाठी महापालिकेची परवानगी नसणे, ध्वनिप्रदूषणाचा संभाव्य धोका, वाहतुकीवर परिणाम तसेच परिसरातील रुग्णालयांकडे जाणाऱ्या मार्गांवर अडथळा निर्माण होण्याची शक्यता या कारणांचा हवाला देत पोलिसांनी आंदोलनाला मंजुरी दिली नव्हती.

तरीही आंदोलन झाल्याने उच्च न्यायालयाच्या आदेशांसह राज्य सरकारने लागू केलेल्या निर्बंधांचे उल्लंघन झाल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांकडून कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.

CJPने ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याव्यतिरिक्त विशेष मतदार यादी पुनरावलोकनाची (SIR) प्रक्रिया थांबवावी आणि २०२५च्या मतदार यादीच्या आधारे २०२९ची निवडणूक घ्यावी, अशी मागणी केली आहे. मुंबईनंतर देशातील अन्य शहरांमध्येही आंदोलन करण्याचा पक्षाचा मानस असल्याचे सांगण्यात आले आहे.