
Image Source:(Internet)
नागपूर : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीत भाजपचे सुधाकर कोहळे यांनी काँग्रेसचे अभिजित वंजारी यांच्याविरोधात आघाडी घेतली आहे. बाद फेरीतील २८ उमेदवारांची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर कोहळे यांना ६१ हजार २९, तर वंजारी यांना ५६ हजार ७८५ मते मिळाली आहेत. त्यामुळे कोहळे सध्या ४ हजार २४४ मतांनी पुढे आहेत.
पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये विजयासाठी आवश्यक कोटा पूर्ण न झाल्याने मतमोजणीची प्रक्रिया पुढे सुरू आहे. बाद झालेल्या उमेदवारांच्या मतपत्रिकांवरील पुढील पसंतीची मते मोजली जात असल्याने उमेदवारांच्या मतसंख्येत बदल होत आहेत. त्यामुळे सध्याची आघाडी अंतिम निकालापर्यंत कायम राहणार का, याबाबत उत्सुकता आहे.
अपक्ष उमेदवार नितेश कराळे यांच्या मतांसह इतर उमेदवारांच्या मतपत्रिकांवरील पुढील पसंतीच्या मतांना महत्त्व प्राप्त झाले आहे. ही मते कोहळे किंवा वंजारी यांच्यापैकी कोणाच्या बाजूने जातात, यावर विजयाचे गणित अवलंबून असणार आहे. विशेषतः वंजारी यांना पिछाडी भरून काढण्यासाठी पुढील फेऱ्यांमध्ये अधिक मते मिळवावी लागतील.
मतमोजणीच्या प्रत्येक टप्प्यावर निकालाचे चित्र बदलण्याची शक्यता असल्याने दोन्ही पक्षांचे लक्ष अंतिम आकडेवारीकडे लागले आहे. उर्वरित मतांची मोजणी पूर्ण झाल्यानंतरच विजयावर शिक्कामोर्तब होणार असून, रात्री नऊ वाजेपर्यंत अंतिम निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे.