
Image Source:(Internet)
चंद्रपूर : कौटुंबिक वादातून सासऱ्यांच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील कोठारी येथे घडली आहे. याशिवाय, मध्यस्थी करण्यासाठी पुढे आलेल्या मेहुण्यावरही हल्ला केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी कोठारी पोलिसांनी राहुल दत्तात्रय रामटेके याला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
व्हॉट्सॲप स्टेटसवरून वादाला सुरुवात-
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, राहुल रामटेके आणि त्याची पत्नी दीपिका हे वन विभागात कार्यरत आहेत. प्रसूती रजेच्या काळात दीपिका कोठारी येथील माहेरी राहायला गेली होती. दरम्यान, ३१ ऑगस्ट रोजी पत्नीच्या व्हॉट्सॲप स्टेटसवरून दोघांमध्ये वाद झाल्याचा आरोप आहे. या वादातून राहुलने दीपिकाला मारहाण केल्याची तक्रारही करण्यात आली होती.
या घटनेत दीपिकाच्या मदतीला धावलेल्या तिच्या भावावर धारदार शस्त्राने हल्ला झाल्याचाही आरोप आहे. त्यानंतर दीपिका माहेरीच राहत होती. नोकरीवर परत जाण्यासाठी तिला सासरी असलेले कपडे आणि इतर साहित्य आणायचे होते. मात्र, राहुलने ते देण्यास नकार दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
घरात घुसून कुटुंबीयांना धमकावल्याचा आरोप-
२६ ऑक्टोबर रोजी राहुलने दीपिकाच्या मोबाईलवर जीवे मारण्याची धमकी देणारा संदेश पाठवल्याचा आरोप आहे. दीपिकाने हा संदेश कुटुंबीयांना दाखवला. त्यानंतर काही वेळातच राहुल घराच्या गेटमधून आत आला आणि कुटुंबीयांना जाळून टाकण्याची तसेच चाकूने हल्ला करण्याची धमकी देऊ लागल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
सासऱ्यांच्या अंगावर पेट्रोल ओतले-
तक्रारीनुसार, घराच्या व्हरांड्यात झोपलेल्या सासरे दिवाकर माऊलिकर यांच्या अंगावर राहुलने प्लास्टिकच्या बाटलीतून पेट्रोल ओतले. त्यानंतर तो काडीपेटी काढू लागल्याचा आरोप आहे.
हा प्रकार लक्षात येताच दीपिका आणि तक्रारदाराने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी झटापट झाली. राहुलने कमरेला लावलेला धारदार चाकू काढण्याचा प्रयत्न केला असता दीपिकाने त्याच्या हातातून चाकू हिसकावून दूर फेकल्याचे तक्रारीत नमूद आहे.
आवाज ऐकून काही नातेवाईकही घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला.
मेहुण्यावरही हल्ला; पोलिसांकडून अटक-
पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर राहुलने पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. त्याला घराबाहेर पकडण्याचा प्रयत्न करताना त्याने तक्रारदाराच्या कानशिलात लगावली, चेहऱ्यावर ठोसे मारले आणि डाव्या हाताला चावा घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी कोठारी पोलिसांनी राहुल दत्तात्रय रामटेके याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
कौटुंबिक वादातून घडलेल्या या गंभीर घटनेचा पुढील तपास पोलीस करत असून, तक्रारीतील आरोपांची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच प्रकरणातील सर्व बाबी स्पष्ट होतील.