नागपूर पदवीधर मतदारसंघाचा निकाल आज; ३८ उमेदवारांचे राजकीय भवितव्य ठरणार

    27-Oct-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल आज, मंगळवारी जाहीर होणार आहे. नागपूर विभागीय क्रीडा संकुलात सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली असून, ३८ उमेदवारांच्या राजकीय भवितव्याचा फैसला होणार आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार आणि कोणाच्या गळ्यात आमदारकीची माळ पडणार, याकडे संपूर्ण विदर्भाचे लक्ष लागले आहे.

मतमोजणीसाठी एकूण ८४ टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. सुरुवातीला मतपत्रिकांचे गठ्ठे तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणी केली जाणार आहे. दुपारी दोननंतर पहिला कल समोर येण्याची शक्यता असून, रात्री आठ वाजेपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पसंतीक्रम पद्धतीने होत असल्याने मतमोजणीची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पार पडणार आहे. सर्वप्रथम वैध मतांची निश्चिती करून विजयासाठी आवश्यक मतांचा कोटा ठरविला जाईल. पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये कोणत्याही उमेदवाराला निर्धारित कोटा मिळाला नाही, तर दुसऱ्या आणि आवश्यकतेनुसार पुढील पसंतीक्रमातील मतांची मोजणी केली जाईल. विजयाचा कोटा पूर्ण करणाऱ्या उमेदवाराला विजयी घोषित करण्यात येईल.

या निवडणुकीत नागपूर विभागातील एकूण २ लाख ५५ हजार ६०३ मतदारांपैकी १ लाख ६५ हजार ५४१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे विभागात ६४.७६ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. जिल्हानिहाय मतदानाचा विचार करता गडचिरोलीमध्ये सर्वाधिक ७२.९५ टक्के, तर नागपूर जिल्ह्यात ६०.३० टक्के मतदान झाले. चंद्रपूरमध्ये ७२.५९ टक्के, गोंदियात ७१.५३ टक्के, वर्ध्यात ६८.३७ टक्के आणि भंडाऱ्यात ६७.०७ टक्के मतदान नोंदविण्यात आले.

आता मतमोजणीच्या प्रत्येक फेरीकडे राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये कोण आघाडी घेणार आणि अंतिम निकालात कोण विजय मिळवणार, हे आज स्पष्ट होणार आहे.