भंडाऱ्यात वाघांचा जीवघेणा हल्ला; नवविवाहित मजुराचा मृत्यू, चौघांनी पळून वाचवला जीव

    27-Oct-2026
Total Views |
Image Source:(Internet)

भंडारा : काम संपवून दुचाकीने घरी परतणाऱ्या पाच मजुरांसमोर अचानक दोन वाघ आल्याने एकच खळबळ उडाली. या प्रसंगात २८ वर्षीय अमित भीमराव राऊत याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेल्या अन्य चार मजुरांनी कसाबसा जीव वाचवला. सोमवारी सायंकाळी भंडारा जिल्ह्यातील बासोरा ते नागपूर जिल्ह्यातील वेलतूरदरम्यान गराडा नहर मार्गावर ही घटना घडली. अमितचा विवाह अवघ्या सहा महिन्यांपूर्वी झाला होता.

अमित हा बांधकामाच्या ठिकाणी छताच्या स्लॅबचे ढाचे तयार करण्याचे काम करत होता. सोमवारी तो बासोरा येथील चार सहकाऱ्यांसह वेलतूर येथे कामासाठी गेला होता. काम आटोपल्यानंतर पाचही जण दोन दुचाकींवरून घराकडे निघाले. सायंकाळी सात ते आठच्या सुमारास गराडा-बासोरा नहर मार्गावर त्यांना अचानक दोन वाघ दिसले. त्यामुळे घाबरलेल्या मजुरांनी दुचाकी सोडून पळ काढण्याचा प्रयत्न केला.

या धावपळीत अमित खाली पडला. वाघांपासून बचाव करण्यासाठी त्याने जवळच्या झुडपांचा आणि वन विभागाच्या टीसीएम नालीचा आश्रय घेतला. मात्र, एका वाघाने त्याच्यावर झडप घालत मानेवर हल्ला केला. यात अमितचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेत इतर चार मजूर बचावले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली.

जंगलालगतच्या मार्गावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
गराडा-बासोरा नहर मार्गाचा सुमारे दीड किलोमीटरचा भाग घनदाट जंगलातून जातो. हा परिसर उमरेड-करांडला वन्यजीव अभयारण्याच्या बफर क्षेत्रालगत असल्याने येथे वाघांचा वावर असतो. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

सामाजिक कार्यकर्ते प्रवीण उदापुरे यांनी या मार्गावर सावधानतेचे फलक लावणे, सौर दिव्यांची व्यवस्था करणे आणि वन विभागाची गस्त वाढविण्याची मागणी केली आहे. तसेच मृत अमितच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत देण्याचे आवाहन केले आहे. विवाहाला अवघे सहा महिने झालेल्या अमितच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.