कर्जतमधील वृक्षतोडीवरून सरकारची कोंडी; सुधीर मुनगंटीवारांचा पर्यायी जागेचा आग्रह!

    26-Oct-2026
Total Views |
Image Source:(Internet)

कर्जत : कर्जत परिसरातील टोरेंट कंपनीच्या प्रकल्पासाठी होत असल्याचा आरोप असलेल्या वृक्षतोडीवरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. कर्जत आणि भीमाशंकर अभयारण्य परिसरातील वृक्षतोडीचे फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर वृक्षप्रेमींसह विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आमदार आदित्य ठाकरे आज या ठिकाणी भेट देणार असून, या मुद्द्यावरून सरकारवर दबाव वाढण्याची शक्यता आहे.

या वादात आता भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. “आवश्यक नसताना वृक्षतोड करू नये. दुसऱ्या जागेवर प्रकल्पाचे काम करणे शक्य असेल, तर जंगल वाचवण्याला प्राधान्य दिले पाहिजे,” असे त्यांनी म्हटले आहे. वृक्षतोड टाळण्यासाठी पर्यायी जागांचा विचार करण्याबरोबरच याबाबत शास्त्रीय अभ्यास करण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.

वृक्षतोडीवरून विरोधकांकडून सरकारवर टीका होत असतानाच मुनगंटीवार यांनी मांडलेल्या भूमिकेमुळे राजकीय चर्चेला नवे वळण मिळाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही या मुद्द्यावर आपली भूमिका मांडली आहे.

एकीकडे भाजपकडून वृक्षतोडीबाबत खोटा प्रचार होत असल्याचे म्हटले जात असताना, दुसरीकडे मुनगंटीवार यांनी पर्यायी जागेचा आग्रह धरल्याने सरकारची भूमिका चर्चेत आली आहे. आता या प्रकरणात सरकार काय भूमिका घेते आणि वृक्षतोड रोखण्यासाठी कोणते पाऊल उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.