
Image Source:(Internet)
नवी मुंबई : राज्यातील शहर नियोजन, वाढती वाहतूक कोंडी आणि विकासकामांच्या नियोजनशून्यतेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “मी खरंच वाट बघतोय की, हा महाराष्ट्र माझ्या हातात सत्ता कधी देतोय याची. अशा गोष्टींना शिस्त लावणे हे काही रॉकेट सायन्स नाही. त्यासाठी केवळ इच्छाशक्तीची गरज आहे,” असे म्हणत त्यांनी सध्याच्या विकास प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले.
नवी मुंबई येथे सोमवारी (२६ ऑक्टोबर) आयोजित वाहतूक सेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी शहर नियोजनातील त्रुटी, वाहतुकीचे वाढते प्रश्न आणि सरकारच्या कार्यपद्धतीवर भाष्य केले.
देशातील वाहतुकीची परिस्थिती पाहून देशाचे वर्तमान आणि भविष्य लक्षात येते, असे सांगत राज ठाकरे म्हणाले की, वाहन चालवण्यापासून ते पार्किंगपर्यंतच्या मूलभूत बाबींचेही योग्य नियोजन होताना दिसत नाही. सरकारकडून उड्डाणपूल आणि मोठे रस्ते उभारले जातात; मात्र हे प्रकल्प राबवताना वाहतुकीचा भविष्यातील ताण लक्षात घेतला जात नाही. अनेक रस्त्यांची कामे काही वर्षांतच पुन्हा काढावी लागतात, ही बाबही त्यांनी अधोरेखित केली.
शहरांचा विकास करताना तज्ज्ञांना विश्वासात घेण्याऐवजी बांधकाम व्यावसायिकांशी असलेल्या जवळिकीच्या आधारावर आराखडे तयार केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. “टाउन प्लॅनिंग नावाची गोष्टच उरलेली नाही,” अशी टीका करत शहरांच्या वाढत्या लोकसंख्येचा आणि वाहनसंख्येचा विचार करून नियोजन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याबाबत स्वतःचे उदाहरण देताना ठाकरे म्हणाले की, त्यांना पोलीस संरक्षण असले तरी त्यांच्या चालकांना कितीही घाई असली तरी सिग्नल मोडू नये, अशी सक्त ताकीद आहे. दररोज किती नवीन वाहनांची नोंदणी होते, किती वाहने रस्त्यावर येतात आणि शहरांमध्ये किती लोक वास्तव्यासाठी येतात, याचा पुरेसा अंदाज किंवा समन्वित नियोजन नसल्याने वाहतुकीचा अतिरिक्त ताण पोलिसांवर पडतो, असेही त्यांनी नमूद केले.
मुंबई लोकल सेवा विस्कळीत झाल्यास मोठ्या संख्येने प्रवासी खासगी वाहनांनी रस्त्यावर उतरले तर परिस्थिती कशी हाताळली जाईल, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. केवळ देशाचा सकल राष्ट्रीय उत्पादनवाढीचा दर ७.८ टक्के असल्याचे सांगून विकासाचे चित्र स्पष्ट होत नाही, असे म्हणत त्यांनी विकासासोबत मूलभूत सुविधा आणि दीर्घकालीन नियोजनालाही महत्त्व देण्याची आवश्यकता अधोरेखित केली.