
Image Source:(Internet)
सुलतानपूर : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना मानहानीच्या खटल्यातून दिलासा मिळाला आहे. भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह विधान केल्याच्या प्रकरणात सुलतानपूर येथील विशेष खासदार-आमदार न्यायालयाने २६ ऑक्टोबर रोजी राहुल गांधी यांना दोषमुक्त केले.
२०१८ मध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बंगळुरू येथे राहुल गांधी यांनी अमित शाह यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप करण्यात आला होता. या विधानामुळे मानहानी झाल्याचा दावा करत भाजप नेते आणि जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष विजय मिश्रा यांनी ४ ऑगस्ट २०१८ रोजी न्यायालयात तक्रार दाखल केली होती.
या प्रकरणात २७ नोव्हेंबर २०२३ रोजी न्यायालयाने राहुल गांधी यांना समन्स बजावले. त्यानंतर २० फेब्रुवारी २०२४ रोजी न्यायालयात हजर झाल्यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. पुढील सुनावणीदरम्यान तक्रारदार आणि त्यांच्या साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले. राहुल गांधी यांचाही जबाब नोंदवण्यात आला होता.
दरम्यान, राहुल गांधी यांच्या आवाजाच्या नमुन्याची पडताळणी करण्याची मागणी तक्रारदारांनी केली होती. मात्र, कनिष्ठ न्यायालयापासून उच्च न्यायालयापर्यंत ही मागणी फेटाळण्यात आली. अखेर या प्रकरणातील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर विशेष न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषमुक्त करण्याचा निर्णय दिला.
सुमारे सहा वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकरणात न्यायालयाच्या निर्णयामुळे राहुल गांधी यांना मोठा दिलासा मिळाला आहे.