
Image Source:(Internet)
सांगली : सांगली जिल्ह्यात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनला असून, कृष्णा नदीत कोयना धरणातून तातडीने पाणी सोडण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. पलूस तालुक्यातील भिलवडी येथे कोरड्या पडलेल्या कृष्णा नदीपात्रात त्यांनी शेकडो शेतकऱ्यांसह ठिय्या आंदोलन केले.
सांगली जिल्ह्यात दुष्काळाचे सावट गडद होत असताना कृष्णा नदीकाठच्या गावांमध्ये पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. भिलवडी आणि परिसरातील नदीपात्र कोरडे पडल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर शेतीसाठी पाणी उपलब्ध होत नसल्याने शेतकरीही चिंतेत आहेत. जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे.
या परिस्थितीत कोयना धरणातून कृष्णा नदीत तातडीने पाणी सोडावे, अशी मागणी आमदार विश्वजीत कदम यांनी केली. या मागणीसाठी त्यांनी शेतकऱ्यांसह थेट कोरड्या नदीपात्रात उतरून आंदोलन केले. नदीत पाणी सोडण्याबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
दोन दिवसांत पाणी न सोडल्यास रस्त्यावर उतरू-
कोयना धरणातून पुढील दोन दिवसांत कृष्णा नदीत पाणी सोडण्यात आले नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आमदार विश्वजीत कदम यांनी दिला आहे. त्यामुळे नदीत पाणी सोडण्याच्या मागणीवरून प्रशासनाची भूमिका काय राहणार, याकडे आता शेतकरी आणि स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.