ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर यांची प्रकृती चिंताजनक? स्मरणशक्तीवर परिणाम; करीना कपूरने केला खुलासा

    26-Oct-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर यांच्या प्रकृतीबाबत अभिनेत्री करीना कपूर खान हिने महत्त्वाची माहिती दिली आहे. रणधीर कपूर यांच्या स्मरणशक्तीवर परिणाम होत असून, ते डिमेन्शिया या आजाराचा सामना करत असल्याचे करीनाने सांगितले. वडिलांच्या प्रकृतीविषयी बोलताना ती भावुक झाल्याचेही समोर आले आहे.

करीना कपूर खान आणि तिचा पती अभिनेता सैफ अली खान यांनी नुकतीच ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये हजेरी लावली होती. या कार्यक्रमात दोघांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक किस्से सांगितले. याचदरम्यान करीनाने वडील रणधीर कपूर यांच्या प्रकृतीविषयी भाष्य केले.

करीनाने सांगितले की, तिचे आई-वडील अलीकडेच तिच्या घरी आले होते. रणधीर कपूर यांचे वय आता ८० वर्षांच्या जवळ पोहोचले असून, त्यांची स्मरणशक्ती हळूहळू कमी होत आहे. त्यांना जुन्या चित्रपटांची आणि गाण्यांची विशेष आवड असल्याचेही तिने नमूद केले.

रणधीर कपूर यांच्या प्रकृतीविषयी यापूर्वीही चर्चा झाली होती. २०२२ मध्ये अभिनेता रणबीर कपूर याने एका मुलाखतीदरम्यान आपले काका रणधीर कपूर यांना डिमेन्शियाची सुरुवातीची लक्षणे असल्याचे म्हटले होते. मात्र, त्यावेळी रणधीर कपूर यांनी या विधानाचे खंडन केले होते. आता करीनाने दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमात वडिलांच्या प्रकृतीविषयी माहिती दिल्याने हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.

दरम्यान, डिमेन्शिया हा मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम करणाऱ्या लक्षणांचा समूह आहे. यामध्ये स्मरणशक्ती, विचार करण्याची क्षमता आणि दैनंदिन कामे करण्याच्या क्षमतेत अडचणी निर्माण होऊ शकतात. वाढत्या वयात स्मरणशक्ती कमी होण्यामागे विविध कारणे असू शकतात. त्यामुळे योग्य वैद्यकीय तपासणी आणि तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा ठरतो.