इंदूरमध्ये संघाची महत्त्वपूर्ण बैठक; ड्रग्जच्या समस्येपासून जागतिक घडामोडींपर्यंत होणार चर्चा

    24-Oct-2026
Total Views |
२ ते ४ नोव्हेंबरदरम्यान अखिल भारतीय कार्यकारी मंडळाचे मंथन; शताब्दी वर्षातील उपक्रमांचाही घेतला जाणार आढावा

Image Source:(Internet)

नागपूर : देशातील वाढती अंमली पदार्थांची समस्या, सोशल मीडियावरील आशय आणि बदलती जागतिक परिस्थिती या मुद्द्यांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आगामी बैठकीत चर्चा होणार आहे. मध्य प्रदेशातील इंदूर येथे २ ते ४ नोव्हेंबरदरम्यान संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाची वार्षिक बैठक आयोजित करण्यात आली आहे. देशातील सद्यस्थितीचा आढावा घेण्यासोबतच संघाच्या भविष्यातील कार्याची दिशा ठरविण्याच्या दृष्टीने या बैठकीला महत्त्व आहे.

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीला सहसरकार्यवाह, अखिल भारतीय कार्यविभागांचे प्रमुख तसेच संघाच्या विविध प्रांतांतील वरिष्ठ पदाधिकारी सहभागी होणार आहेत. संघरचनेतील ४६ प्रांतांचे प्रांत संघचालक, प्रांत कार्यवाह आणि प्रांत प्रचारकांचाही यात समावेश असेल.

विजयादशमी उत्सवातील सरसंघचालकांच्या भाषणात मांडण्यात आलेल्या मुद्द्यांवरही बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. विशेषतः अंमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याला आळा घालण्यासाठी व्यापक स्तरावर प्रयत्न करण्याच्या विषयावर विचारविनिमय केला जाणार आहे. याशिवाय नव्या माध्यमांमधून प्रसारित होणारा आशय, देशातील सामाजिक परिस्थिती, बाह्य शक्तींचा हस्तक्षेप आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचाही आढावा घेतला जाईल.

संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त देशभरात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचे मूल्यमापन हा बैठकीतील आणखी एक महत्त्वाचा भाग असेल. वर्षभरातील कार्यक्रमांची व्याप्ती, त्यांची अंमलबजावणी आणि त्यातून साध्य झालेले परिणाम यांचा आढावा घेऊन पुढील वाटचालीबाबत चर्चा होणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी दिली.

दरम्यान, संघाच्या संघटनात्मक रचनेत बदल होण्याची शक्यता चर्चेत आहे. सध्याच्या प्रांत व्यवस्थेऐवजी संभाग पद्धत लागू करण्याच्या संभाव्य निर्णयामुळे ही बैठक विद्यमान प्रांत प्रचारक व्यवस्थेतील शेवटची ठरू शकते. या बदलाबाबत अधिकृत निर्णय झाल्यास संघाच्या कामकाजाच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल अपेक्षित आहेत.