मतदारांच्या नावांऐवजी आक्षेपार्ह शब्द, वडिलांच्या नावाच्या रकान्यात ‘बी.कॉम’; निवडणूक आयोगाच्या कारभारावर उपस्थित केले प्रश्न

Image Source:(Internet)
मुंबई : उत्तर प्रदेशातील मतदारयादीत मतदारांची विचित्र आणि चुकीची नावे नोंदवली गेल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी निवडणूक आयोगावर टीका केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मतदारयादीतील कथित त्रुटी निदर्शनास आणून दिल्या असून, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित केले आहेत.
रोहित पवार यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये उत्तर प्रदेशातील इलाहाबाद-झाशी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीशी संबंधित मतदारयादीतील काही नोंदींचा उल्लेख केला. मतदारांच्या नावाच्या रकान्यात ‘राम ने यादव को मारा’, तर वडिलांच्या नावाच्या जागी ‘मूर्ख चंद्र यादव’ असे शब्द नमूद असल्याचा दावा त्यांनी केला. काही नोंदींमध्ये वडिलांच्या नावाऐवजी ‘बी.कॉम’ असा उल्लेख असल्याचेही त्यांनी सांगितले. याशिवाय इतर काही नावांमध्येही गंभीर चुका असल्याचे त्यांनी पोस्टमधून निदर्शनास आणले.
‘हा गलथान कारभार नाही का?’ रोहित पवारांचा सवाल-
मतदारयादीतील या कथित त्रुटींवरून रोहित पवार यांनी निवडणूक आयोगाच्या कामकाजावर टीका केली. मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान (SIR) झालेल्या त्रुटींबाबत विरोधकांनी यापूर्वी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर प्रदेशातील या प्रकरणामुळे बळ मिळत असल्याचा दावा त्यांनी केला.
‘एवढा गलथानपणा केवळ ज्ञानेश कुमार यांनाच शोभतो,’ अशा शब्दांत त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांवर निशाणा साधला. तसेच या प्रकरणावर भाजपने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली. त्यांच्या या टीकेनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली आहे.
सॉफ्टवेअरमधील त्रुटींमुळे चुका झाल्याचे स्पष्टीकरण-
दरम्यान, उत्तर प्रदेशातील मतदारयादीतील चुकीच्या नोंदींबाबत सॉफ्टवेअरमधील त्रुटींचे कारण पुढे आल्याचे वृत्त आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी प्रथमच ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आल्याने काही नोंदींमध्ये चुका झाल्याचे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्याचे सांगितले जात आहे.
मतदारयादीतील अशा त्रुटींमुळे नोंदणी प्रक्रिया आणि माहितीच्या पडताळणीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणावर निवडणूक आयोगाकडून पुढे कोणती कार्यवाही केली जाते आणि रोहित पवार यांच्या आरोपांवर भाजपकडून काय प्रतिक्रिया दिली जाते, याकडे लक्ष लागले आहे.