
Image Source:(Internet)
नागपूर : मद्यप्राशन करून भरधाव कार चालवताना दोन वाहनांना धडक दिल्याच्या प्रकरणात केतन हिवंज याला सीताबर्डी पोलिसांनी अटक केली आहे. अमरावती जिल्ह्यातील एका आमदाराचा खासगी सहायक असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या हिवंजच्या कारच्या धडकेत २८ वर्षीय डिलिव्हरी बॉय राहील शकील शेख गंभीर जखमी झाला. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, दसऱ्याच्या रात्री मद्यपानाच्या पार्टीवरून घरी परतताना हिवंज हा कार वेगाने चालवत होता. संविधान चौकाजवळ त्याच्या कारने राहीलच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत राहील रस्त्यावर फेकला गेला आणि त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर जखमीला मदत करण्याऐवजी आरोपी घटनास्थळावरून कारसह पसार झाला.
यानंतर काही अंतरावर त्याच्या कारने एका पिकअप वाहनालाही धडक दिली. दुसऱ्या अपघातानंतर कार थांबल्याने पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले. वैद्यकीय तपासणीत त्याच्या रक्तात मद्य आढळल्याचे समजते. निष्काळजीपणे व धोकादायक पद्धतीने वाहन चालविणे, अपघातात दुखापत करणे आणि मद्यप्राशन करून वाहन चालविण्याच्या आरोपांखाली त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, गंभीर जखमी झालेला राहील हा आपल्या कुटुंबातील एकमेव कमावता सदस्य असल्याची माहिती समोर आली आहे. तो रुग्णालयात उपचार घेत असल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेमुळे मद्यप्राशन करून वाहन चालविण्याच्या धोकादायक प्रकारावर पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत.