५०० कोटींच्या कथित व्यवहारावरून राजकीय वाद; श्रीकांत शिंदेंच्या चौकशीची चंद्रकांत खैरेंची मागणी

    24-Oct-2026
Total Views |
ऑडिओ क्लिपची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी; मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा, फॉरेन्सिक तपासावर भर

Image Source:(Internet)

मुंबई :
मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेल्या ५०० कोटी रुपयांच्या कथित व्यवहाराच्या ऑडिओ क्लिपवरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणात आता उद्धवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या चौकशीची मागणी केली आहे. तसेच संबंधित ऑडिओ क्लिपची न्यायवैद्यकीय तपासणी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाला समाजातून मोठा पाठिंबा मिळाला. मात्र, त्यांच्या वाढत्या प्रभावामुळे काही राजकीय नेत्यांना अस्वस्थता वाटू लागली का, असा सवाल चंद्रकांत खैरे यांनी उपस्थित केला. जरांगे यांना सुरुवातीला मोठे करणारे कोण आणि आता त्यांना बाजूला करण्याचे प्रयत्न का होत आहेत, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

वादग्रस्त ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक तपासणी करून त्यातील संभाषणाची सत्यता पडताळली पाहिजे, असे खैरे यांनी म्हटले आहे. या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव चर्चेत येत असल्याने त्यांनी स्वतः निर्णय घेण्याऐवजी सरकारने निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली. कथित व्यवहारात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे नाव घेतले जात असेल, तर त्यांचीही चौकशी व्हावी, असे खैरे म्हणाले.

दरम्यान, या प्रकरणावरून भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतही आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शिंदेसेनेचे नेते रामदास कदम यांनी भाजपवर एकनाथ शिंदे यांना राजकीयदृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी हे आरोप फेटाळून लावत महायुतीत वाद निर्माण करू नये, असे आवाहन केले.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही या ऑडिओ क्लिपचे तांत्रिक व न्यायवैद्यकीय विश्लेषण करण्याची मागणी केली आहे. मनोज जरांगे पाटील आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व संपवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे कथित ऑडिओ क्लिपची सत्यता आणि त्यातील दाव्यांबाबतच्या तपासाकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.