
Image Source:(Internet)
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनंतर आता राज्यातील एकल महिलांसाठी स्वतंत्र आर्थिक मदत योजना आणण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. कुटुंबाची जबाबदारी एकट्याने सांभाळणाऱ्या महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारकडून त्यांच्या परिस्थितीची माहिती गोळा केली जात आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रमात याबाबत प्राथमिक माहिती दिली.
पतीचे निधन झालेल्या, घटस्फोटित, परित्यक्ता तसेच आजीवन अविवाहित महिलांना प्रस्तावित योजनेच्या माध्यमातून मदत देण्याचा विचार असल्याचे सांगितले जात आहे. या महिलांना मुलांचे संगोपन, शिक्षण, घरखर्च आणि दैनंदिन गरजांचा भार स्वतःच उचलावा लागतो. अशा महिलांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी स्वतंत्र योजना आखण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे.
महाराष्ट्रात १२ लाखांहून अधिक एकल महिला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या महिलांची नेमकी संख्या आणि त्यांची आर्थिक-सामाजिक परिस्थिती समजून घेण्यासाठी माहिती संकलन सुरू आहे. उपलब्ध माहितीनुसार, आतापर्यंत तीन लाखांहून अधिक महिलांची नोंद झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतरच राज्यातील एकल महिलांची निश्चित संख्या स्पष्ट होणार आहे.
एकल महिलांच्या कुटुंबांची परिस्थिती जाणून घेण्यासाठी शिक्षण विभागाच्या माध्यमातून शाळा आणि महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची माहिती संकलित केली जात असल्याचे समजते. वडील नसलेल्या विद्यार्थ्यांची नोंद घेऊन संबंधित कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. पुढील टप्प्यात तहसील आणि गावपातळीवरही माहिती गोळा केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
या माहितीच्या आधारे गरजू महिलांची संख्या, त्यांच्या कुटुंबांपुढील आर्थिक अडचणी आणि त्यांना आवश्यक असलेल्या मदतीचे स्वरूप निश्चित करण्यास मदत होऊ शकते. एकल महिलांसाठी स्वतंत्र योजना प्रत्यक्षात सुरू झाल्यास कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी सांभाळणाऱ्या महिलांना मोठा आधार मिळू शकतो. मात्र, योजनेची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. मदतीची रक्कम, पात्रतेचे निकष, अर्ज प्रक्रिया आणि योजनेच्या अंमलबजावणीबाबतही स्पष्टता आलेली नाही. त्यामुळे राज्य सरकारच्या अंतिम निर्णयाकडे आणि अधिकृत घोषणेकडे महिलांचे लक्ष लागले आहे.