नागपूर पदवीधर निवडणुकीसाठी मतदान सुरू; २.५५ लाख मतदार बजावणार हक्क

    23-Oct-2026
Total Views |
३८ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार, २७ ऑक्टोबरला मतमोजणी

Image Source:(Internet)

नागपूर :
महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज, शुक्रवार २३ ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे. सहा जिल्ह्यांतील २ लाख ५५ हजार ६०३ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून, सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीत एकूण ३८ उमेदवार रिंगणात असून, त्यांच्या राजकीय भवितव्याचा फैसला २७ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मतमोजणीतून स्पष्ट होईल.

निवडणुकीसाठी सहाही जिल्ह्यांमध्ये ४४५ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडावी, यासाठी निवडणूक प्रशासनाकडून आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त तथा निवडणूक नोंदणी अधिकारी विजयलक्ष्मी बिदरी यांच्या मार्गदर्शनाखाली मतदानाचे नियोजन पूर्ण करण्यात आले आहे.

एकूण मतदारांमध्ये १ लाख ४७ हजार २८० पुरुष, १ लाख ८ हजार ३०१ महिला आणि इतर प्रवर्गातील २२ मतदारांचा समावेश आहे. जिल्हानिहाय आकडेवारीनुसार, नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक १ लाख ४४ हजार ४६६ मतदार असून, चंद्रपूरमध्ये ३२ हजार २६२, गोंदियात २२ हजार १७६, वर्ध्यात २१ हजार ७४२, भंडाऱ्यात २१ हजार ३४९ आणि गडचिरोलीत १३ हजार ६०८ मतदार आहेत.

मतदान केंद्रांच्या संख्येतही नागपूर जिल्हा आघाडीवर आहे. नागपुरात २४६, चंद्रपुरात ५८, वर्ध्यात ४१, गोंदियात ३९, भंडाऱ्यात ३५ आणि गडचिरोलीत २६ केंद्रांवर मतदान होणार आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी २ हजार ५३५ शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, केंद्र सरकारचे ४७६ अधिकारीही उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

दरम्यान, नोंदणीकृत पदवीधर मतदारांना मतदान करता यावे, यासाठी खासगी आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांना दोन तासांऐवजी चार तासांची विशेष सवलत देण्यात आली आहे. मतदानानंतर २७ ऑक्टोबर रोजी नागपूरच्या मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात मतमोजणी होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने लागतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.