
Image Source:(Internet)
नंदुरबार : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, भूमिहीन शेतमजूर व ग्रामीण कष्टकऱ्यांना दरमहा पाच हजार रुपये जीवननिर्वाह अनुदान द्यावे आणि प्रलंबित वनहक्क दाव्यांचा तातडीने निपटारा करावा, या प्रमुख मागण्यांसाठी सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली नंदुरबारमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मागण्यांची २६ नोव्हेंबरपर्यंत अंमलबजावणी न झाल्यास नाशिक ते मुंबई पायी विराट महामोर्चा काढण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
सत्यशोधक शेतकरी सभा आणि सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने आयोजित हा मोर्चा देवळफळी परिसरातून सुरू झाला. शहरातील विविध मार्गांवरून मार्गक्रमण करत मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. यावेळी विविध मागण्यांच्या घोषणा देत शासनाचे लक्ष वेधण्यात आले. मोर्चानंतर निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. मतदारयादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (एसआयआर) प्रक्रियेलाही यावेळी विरोध करण्यात आला.
नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यांत पावसातील खंडामुळे सोयाबीन, भात, कपाशी आणि तूर या पिकांचे नुकसान झाले असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे संघटनेने निवेदनात म्हटले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्यासह वनहक्कधारकांना सातबारा उतारा व फार्मर आयडी उपलब्ध करून द्यावा, पाणीटंचाई दूर करावी, शेतीपंपांना नियमित वीजपुरवठा करावा आणि कर्जमुक्ती, हमीभाव व रोजगार हमीच्या प्रश्नांवर त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.
याशिवाय आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांतील समस्या सोडवणे, ग्रामीण भागात आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे, घरकुलांचे प्रलंबित अनुदान वितरित करणे आणि पात्र नागरिकांची नावे मतदारयादीतून वगळली जाणार नाहीत, याची दक्षता घेण्याची मागणीही करण्यात आली.
या मोर्चात कॉम्रेड आर. टी. गावित, कॉम्रेड विक्रम गावित, कॉम्रेड शीतल गावित, कॉम्रेड मनिला ताई गावित यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.