जरांगेंच्या ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक तपासणी होणार; फडणवीस म्हणाले, ‘अडीच वर्षांनंतर का?’

    23-Oct-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : मनोज जरांगे पाटील यांनी ५०० कोटी रुपयांच्या कथित व्यवहारासंदर्भात ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्लिपची सत्यता पडताळण्यासाठी फॉरेन्सिक तपासणी करण्याचे आश्वासन दिले. मात्र, अडीच वर्षांपूर्वीचे संभाषण आता समोर आणण्यामागे नेमका उद्देश काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीची ग्वाही दिली. मनोज जरांगे यांच्यासह शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आणि भाजपनेही तपासाची मागणी केली आहे. त्यानुसार एसआयटी, सायबर सेल आणि फॉरेन्सिक लॅबच्या माध्यमातून ऑडिओ क्लिपची तपासणी केली जाईल. चौकशीनंतरच या प्रकरणातील सत्य स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले.

‘महायुतीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न’
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना माजी खासदार राहुल शेवाळे यांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला. महायुतीच्या नेत्यांमध्ये मतभेद निर्माण करणे, तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलिन करणे, हा यामागील हेतू असल्याचा दावा त्यांनी केला.

संजय राऊतांचा सरकारला सवाल-
दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणाच्या चौकशीवरून सरकारला लक्ष्य केले. ५०० कोटी रुपये दिल्याचे भाजपचे नेते सांगत असतील, तर ही रक्कम नेमकी कुठे गेली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. एसआयटी स्थापन करण्याच्या घोषणेवर टीका करत त्यांनी अशा चौकशींतून प्रत्यक्षात काय निष्पन्न होते, असा प्रश्नही उपस्थित केला.

आता या कथित ऑडिओ क्लिपची सत्यता तपासात स्पष्ट होते का आणि ५०० कोटींच्या आरोपामागील वस्तुस्थिती काय आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.