दिवाळीपूर्वी पुरवठा वाढण्याची शक्यता; देशांतर्गत बाजारातील चांदीचा प्रीमियम घसरला

Image Source:(Internet)
नवी दिल्ली : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने चांदीच्या आयातीसाठी मोठ्या प्रमाणात परवानग्या दिल्याची माहिती समोर आली आहे. पुढील सहा महिन्यांसाठी सुमारे ६ हजार ५०० मेट्रिक टन चांदीच्या आयातीला मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे देशांतर्गत बाजारातील चांदीचा पुरवठा वाढण्याची शक्यता असून, त्याचा किमतींवर परिणाम होऊ शकतो. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, चार सराफा व्यापाऱ्यांनी या आयात परवानग्यांची माहिती दिली आहे.
भारत चांदीच्या गरजेसाठी मोठ्या प्रमाणात आयातीवर अवलंबून आहे. देशातील चांदीच्या मागणीपैकी ८० टक्क्यांहून अधिक गरज आयातीद्वारे पूर्ण केली जाते. मे महिन्यात चांदीच्या आयातीवर निर्बंध घालण्यात आले होते. त्यानंतर जूनमध्ये चांदीचे कण आणि पावडर यांच्या आयातीसाठीही पूर्वपरवानगीची अट लागू करण्यात आली होती. आता नव्या परवानग्यांमुळे बाजारातील पुरवठ्यावरील दबाव कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
चांदीचे दर आणखी घसरणार?
आयातीसाठी मोठ्या प्रमाणात परवानग्या मिळाल्यामुळे देशांतर्गत बाजारातील चांदीचा प्रीमियम कमी झाला आहे. २२ ऑक्टोबर रोजी हा प्रीमियम प्रति औंस ४५ सेंटपर्यंत घसरल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. मागील आठवड्यात तो २.५० डॉलरपर्यंत पोहोचला होता. पुरवठा वाढल्यास स्थानिक बाजारातील अतिरिक्त दर कमी होऊ शकतात. मात्र, त्यामुळे चांदीचे प्रत्यक्ष विक्रीदर निश्चितपणे घसरतील, असे सांगता येत नाही.
दरम्यान, परकीय चलनावरील दबाव कमी करण्यासाठी केंद्र सरकारने मे महिन्यात सोने आणि चांदीवरील आयात शुल्क ६ टक्क्यांवरून १५ टक्के केले होते. सध्या चांदीच्या बाजारात मागणी अपेक्षेइतकी वाढलेली नसल्याचेही व्यापाऱ्यांनी नमूद केले आहे.
त्यामुळे दिवाळीच्या खरेदीपूर्वी चांदीच्या किमतींमध्ये काय बदल होतात, याकडे ग्राहक आणि सराफा व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे. चांदी खरेदी करण्यापूर्वी ग्राहकांनी त्या दिवसाचे स्थानिक बाजारातील दर तपासणे महत्त्वाचे ठरणार आहे.