‘ही' डॉक्युमेंट्री गायब होण्याआधी बघून घ्या; राज ठाकरेंची मोदी-अदाणींवरील व्हिडिओ पोस्ट

    22-Oct-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदाणी यांच्याशी संबंधित डॉक्युमेंट्री फेसबुकवर पोस्ट करत सरकारवर निशाणा साधला आहे. ‘सरकारला ही डॉक्युमेंट्री समाजमाध्यमांवरून गायब करायची आहे. त्यामागचं कारण काय आहे, हे डॉक्युमेंट्री पाहिल्यानंतर कळेल. त्यामुळे ती गायब होण्याआधी बघून घ्या,’ असे आवाहन त्यांनी पोस्टमधून केले आहे.

या डॉक्युमेंट्रीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गौतम अदाणी यांना कथितरीत्या पाठिंबा दिल्याचा आणि त्यातून अदाणी यांना व्यावसायिक फायदा झाल्याचा दावा करण्यात आल्याचे सांगितले जाते. यापूर्वी या डॉक्युमेंट्रीच्या संदर्भात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरील काही खात्यांना ती हटवण्याबाबत मुंबई पोलिसांकडून नोटिसा देण्यात आल्याचा उल्लेखही समोर आला आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांनी EVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली आहे. देशातील निवडणुका पारदर्शकपणे झाल्या पाहिजेत, असे सांगत त्यांनी पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आणि नेपाळमधील निवडणूक प्रक्रियेचा दाखला दिला. ‘जगाने EVM नाकारले, मग भारतातच EVM का?’ असा सवालही त्यांनी उपस्थित केला. फ्रान्समध्ये एका व्यक्तीच्या सांगण्यावरून बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.

याआधीच्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी आगामी चार ते पाच महिन्यांत देशात मोठी घडामोड होण्याची शक्यता व्यक्त केली होती. देशात असंतोष निर्माण होऊन लोक रस्त्यावर उतरले, तरी आश्चर्य वाटणार नाही, असे विधानही त्यांनी केले होते.

निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता, EVM चा वापर आणि सरकारच्या भूमिकेवरून राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारला लक्ष्य केले आहे. त्यांच्या नव्या सोशल मीडिया पोस्टमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.