दिलजीत दोसांझच्या दिल्ली कॉन्सर्टला पोलिसांचा नकार; चाहत्यांना मोठा धक्का!

    22-Oct-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नवी दिल्ली : प्रसिद्ध गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझच्या दिल्लीतील आगामी लाईव्ह कॉन्सर्टला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारल्याची माहिती समोर आली आहे. ३० ऑक्टोबर २०२६ रोजी जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये हा कार्यक्रम होणार होता. कॉन्सर्टसाठी तिकीट विक्रीही सुरू झाली होती. मात्र, सुरक्षा व्यवस्था आणि सणांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी परवानगी नाकारल्याचे वृत्त आहे. याबाबत दिलजीत दोसांझकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

दिलजीतने नुकतीच ‘ऑरा इंडिया टूर’ची घोषणा केली होती. या दौऱ्याची सुरुवात दिल्लीपासून होणार होती. सुरुवातीला दिल्लीतील कॉन्सर्टची तारीख १ नोव्हेंबर निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर कार्यक्रमाच्या तारखेत बदल करून ३० ऑक्टोबर रोजी कॉन्सर्ट आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले होते.

या दौऱ्यांतर्गत देशातील सात शहरांमध्ये कार्यक्रम होणार आहेत. दिल्ली, इंदूर, अहमदाबाद, मुंबई, बंगळुरू आणि लखनऊ या शहरांतील कार्यक्रमांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, चंदीगडमधील कॉन्सर्टची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही.

तिकिटांचे दर किती?
दिल्लीतील कॉन्सर्टसाठी ‘बुक माय शो’वर तिकीट बुकिंग सुरू करण्यात आले होते. तिकिटांची सुरुवातीची किंमत ६,४९९ रुपये, तर सर्वाधिक किंमत १५,९९९ रुपये ठेवण्यात आली होती. हा कार्यक्रम सायंकाळी ४ वाजता सुरू होणार असून, सुमारे सहा तास चालणार असल्याचे सांगण्यात आले होते.

मात्र, पोलिसांच्या परवानगीअभावी आता या कार्यक्रमाचे भवितव्य अनिश्चित झाले आहे. त्यामुळे दिलजीतच्या दिल्लीतील कॉन्सर्टची आतुरतेने वाट पाहणाऱ्या चाहत्यांमध्ये निराशा पसरली आहे.